www.24taas.com, झी मीडिया, जयपूर
चक्क त्याने एकाच मंडपात दोन तरूणींशी विवाह केल्याची घटना उघड झाली आहे. उदयपूर जिल्ह्यातील चातरपुरा गावात हा प्रकार घडला.
आपल्या पालकांच्या संमतीने रविवारी भगवती लाल (२३) याने एकाच मुहूर्तावर दोन मुलींशी विवाह केला. आदिवासी जमातीतील या तरुणाने दोन मुलींशी विवाह केल्याची माहिती झाडोल पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने दिली. योगायोग म्हणजे दोन्ही वधूंचे नाव रेखा आहे.
उदयपूर येथील एका कंपनीमध्ये भगवती नोकरी करीत आहे. भगवती हा पहिल्या रेखा या तरूणीशीं ‘लिव्ह-इन रिलेशनशिप‘मध्ये राहत होता. तसेच तो नाडी गावातील दुसऱ्या रेखा तरूणीच्या प्रेमात पडला. आदिवासी प्रथेप्रमाणे भगवती हा ‘नाता प्रथा’ पाळत होता. या प्रथेनुसार एकापेक्षा जास्त महिलांशी संबंध प्रस्थापित करता येतात, तसेच त्यांच्याशी लग्नही करता येते. त्यामुळे त्याने दोन तरूणींशी विवाह केल्याचे सांगण्यात येत आहे.
गावकऱ्यांनी दिलेल्या जबाबा नोंदीमध्ये ही माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ‘त्या वधू अल्पवयीन आहेत की सूज्ञ याची आम्ही चौकशी करत आहोत. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी पोलीस कर्मचारी पाठविण्यात आला आहे. तर आदिवासी परंपरेनुसार हे विवाह झाले असतील. त्यामध्ये काही गुन्हा घडला आहे का हे तपासावे लागेल, अशी माहिती येथील पोलीस अधिकाऱ्याने दिली.
दरम्यान, आदिवासी समाजाला हिंदू विवाह कायदा कदाचित लागू होऊ शकणार नाही. आताच याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करणे शक्य नाही, असे उदयपूरचे जिल्हाधिकारी विक्रम भाले यांनी स्पष्ट केले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.