‘आणायचंच असेल तर सशक्त लोकपाल आणा’

लोकपाल बिलातील फेरबदलांना आज कॅबिनेटकडून हिरवा कंदील मिळालाय. मात्र, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मात्र हे लोकपाल टाकाऊ ठरवलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 31, 2013, 04:36 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
लोकपाल बिलातील फेरबदलांना आज कॅबिनेटकडून हिरवा कंदील मिळालाय. लोकपाल बिलाच्या बाबतीत संसदेच्या स्थायी समितीच्या अहवालावर आज कॅबिनेटमध्ये चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. मात्र, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मात्र हे लोकपाल टाकाऊ ठरवलंय.
भाजपानं मात्र हे लोकपाल बिल सर्वच पक्षांच्या सहमतीनं बनवण्यात आलंय, त्यामुळे त्याच्यात बदल करण्यास नाखुशी व्यक्त केलीय. यापूर्वी लोकपाल बिलाला लोकसभेत मंजूरी मिळाली होती पण, राज्यसभेत मात्र ते लटकलं होतं. यानंतर हे लोकपाल बिल सिलेक्ट कमिटीकडे सोपवण्यात आलं होतं. या कमिटीनं आपला अहवाल राज्यसभेत सादर केलाय. आता, कॅबिनेटमध्ये चर्चा झाल्यानंतर लोकसभेमध्ये हे बिल पुन्हा एकदा चर्चेसाठी सादर केलं जाईल.
सोनिया गांधी यांनी अण्णांना पत्र लिहून लोकपालबाबत आश्वासन दिलं होतं. त्यानंतर घडामोडींनी अचानक वेग घेतलाय. अण्णांनी मात्र प्रस्तावित जनलोकपाल विधेयकाचे मसुदे टाकाऊ असल्याची टीका केलीय. असं लोकपाल विधेयक आणल्यानं सद्य परिस्थितीत काहीही फरक पडणार नाही... हा केवळ सरकार सरकारचा दिखावा आहे, असं अण्णांनी म्हटलंय.

केंद्रीय चौकशी आयोगाची मागणी करत अण्णांनी एक सशक्त लोकपाल विधेयक लागू होईपर्यंत आपण आपली लढाई सुरूच ठेवणार असल्याचं म्हटलंय. फेब्रुवारीपासून अण्णा देशातील वेगवेगळ्या राज्यांचा दौरा करून लोकांना भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी जागृत करायचा पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहेत. यासाठी अण्णांनी जनतेला पाठिंब्यासाठी आवाहन केलंय. अण्णांनी बुधवारी पाटण्याच्या गांधी मैदानात एका मोर्चाची घोषणा केलीय. यासाठी मंगळवारपासून अण्णा पाटण्यात आहेत.