नवी दिल्ली: अविवाहित महिलेला आपल्या पालक बनण्याचा हक्क असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज सुप्रीम कोर्टानं दिलाय. या निर्णयामुळे आता पाल्याच्या पित्याचं नाव उघड न करता अविवाहित महिला पाल्याचा एकटीनं कायदेशीर पालक म्हणून सांभाळ करू शकेल. त्यासाठी पाल्याच्या वडिलांच्या संमतीची गरज नाही, असंही कोर्टानं नमूद केलंय.
न्यायालयाचा हा निर्णय 'लिव्ह इन रिलेशनशिप'मधील व्यक्तींसाठी अत्यंत महत्वाचा समजला जात आहे. न्यायमूर्ती विक्रमजित सेन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं हा निकाल दिला.
जर एखाद्या महिलेला पाल्याचे वडील कोण याची ओळख उघड करायची नसेल, तर त्यास हरकत घेता येणार नाही. त्यामुळे कोणत्याही कायदेशीर कागदांवर पाल्याच्या पित्याचा उल्लेख न करता ती महिला पाल्याचा एकमेव पालक म्हणून सांभाळ करू शकेल.
एक अविवाहित महिलेनं सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेसंदर्भातील सुनावणीदरम्यान कोर्टानं हा निर्णय दिला. पालक म्हणून पिता कोण आहे आणि पित्याचंच नाव पालक म्हणून लावण्याच्या परंपरेविरोधात त्या महिलेनं याचिकेच्या माध्यमातून आवाज उठवला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.