नवी दिल्ली : उरी येथील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव चांगलेच वाढलेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या अटकळीही बांधल्या जातायत. मात्र भारत या स्थितीला युद्धाचा धोका पत्करणार नसल्याचे पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
18 सप्टेंबरला जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानातील यांच्यातील वातावरण चांगलेच तापलेय.
भारत सरकारनेही जागतिक स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडू असे म्हटलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला याबाबत कठोर शब्दांत सुनावले. यानंतर पाकिस्तानमध्ये याप्रकरणी जोरदार चर्चा सुरु झालीये.
पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की या स्थितीला भारत युद्धाचा धोका पत्करणार नाही. पाकिस्तानस्थित डॉन वृत्तपत्राला नाव न सांगण्याच्या अटीवर पाकिस्तानच्या एका राजनैतिक अधिकाऱ्याने ही प्रतिक्रिया दिली.
अधिकाऱ्याच्या मते, भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल. भारताला यामुळे मोठी समस्या होईल. त्यामुळे दोन्ही देशांदरम्यान युद्ध सोपी गोष्ट नाहीये.