नवी दिल्ली : घटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती संयुक्त राष्ट्रसंघातही साजरी होणार आहे.
१५६ देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही जयंती साजरी केली जाणार आहे.. कमानी ट्यूबज उद्योग समूहाच्या अध्यक्षा कल्पना सरोज यांच्या कल्पनेतून हा योग जुळून येणार आहे. अशाप्रकारे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संयुक्त राष्ट्रसंघात साजरी व्हावी अशी सरोज यांची इच्छा होती.
लंडनमधलं डॉ. आंबेडकरांचं घर राज्य सरकारनं खरेदी केल्यानंतर त्यांच्या कल्पनेला खरी उभारी मिळाली. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे संपर्क साधला. मोदींनाही सरोज यांची कल्पना आवडली आणि त्यांनी त्यांना सर्व सहकार्य करण्याचा शब्द दिला. त्यानंतर सर्व चक्र भराभर फिरली आणि सरोज यांना संयुक्त राष्ट्रसंघाकडून या कार्यक्रमाची परवानगी मिळाली.
या कार्यक्रमाला थायलंडच्या राजकन्या महाचक्री सिरींधर्ण उपस्थित राहणार आहेत. इंग्लंड, अमेरिका, कॅनडा आणि जभरातले अडीचशे प्रतिनिधी या ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार असतील.