एटीएममधून पैसे काढताना महिलेला लुटून प्राणघातक हल्ला

बॅंकेमधून पैसे काढण्यासाठी नागरिकांचा वेळ वाचवणारी एटीएम सुद्धा आता सुरक्षित राहिलेली नाहीत असंच म्हणावं लागेल. बंगळुरुमध्ये एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या एका महिलेवर प्राणघातक हल्ला करुन तिला लुटण्यात आलं.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 20, 2013, 11:52 AM IST

www.24taas.com, झी मीडिया,बंगळुरु
बॅंकेमधून पैसे काढण्यासाठी नागरिकांचा वेळ वाचवणारी एटीएम सुद्धा आता सुरक्षित राहिलेली नाहीत असंच म्हणावं लागेल. बंगळुरुमध्ये एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या एका महिलेवर प्राणघातक हल्ला करुन तिला लुटण्यात आलं.
या हल्ल्यात ही महिला गंभीर जखमी झाली. एक व्यक्ती एटीएमचं शटर बंद करून महिलेला धमकावू लागला. त्यावेळी त्याला हातात बंदूकही होती. दागिने लुटल्यानंतर दरोडेखोर त्या महिलेनं एटीएममधून कॅश काढून आपल्या हातात द्यावी अशी मागणी करत होता. महिलेनं त्याला विरोध दर्शवला.
बँक मॅनेजर असलेल्या एका महिलेवर एटीएममध्ये घुसून एका तरुणाने प्राणघातक हल्ला केला तसेच रोकड रकमेची लूट केल्याची घटना मंगळवारी बंगळुरूमध्ये घडली. एटीएममध्ये या घडलेल्या सर्व घटनेचे चित्रण सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झाल्याने ते मंगळवारी दिवसभर वृत्तवाहिन्यावर तसेच सोशल साईट्सवर दिसले.
या फूटेजमध्ये हा तरुण या महिलेवर कोयत्याने वार करीत असल्याचे दिसत असून ही घटना मंगळवारी सव्वा सातच्या सुमारास घडली. ज्योती उदय असे या महिलेचे नाव असून त्या जखमी झाल्याने त्यांच्यावर नजिकच्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे. सकाळची वेळ असल्याने या ठिकाणी जास्त वर्दळ नव्हती. तसेच या ठिकाणी सुरक्षा रक्षकही नसल्याने या तरूणाने ज्योती यांना लक्ष्य केले.
ज्योती या एटीएममध्ये गेल्यानंतर तरुणही मागोमाग आत शिरला व त्याने शटर बंद करून त्यांना धमकावले. ज्योती यांनी विरोध केल्यानंतर त्याने त्यांच्यावर हल्ला केला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हि़डिओ