विनयभंगाची तक्रार... महिलांना तीन महिने भरपगारी रजा!

केंद्रीय कर्मचारी असलेल्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लैंगिक छळाची तक्रार नोंदवण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्यात आलंय.

Updated: Mar 21, 2017, 09:24 PM IST
विनयभंगाची तक्रार... महिलांना तीन महिने भरपगारी रजा!

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचारी असलेल्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लैंगिक छळाची तक्रार नोंदवण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्यात आलंय.

ज्या महिलांनी ऑफिसमध्ये विनयभंगाची तक्रार केलीय, अशा महिलांना त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईपर्यंत तीन महिन्यांची भरपगारी सुट्टी मिळणार आहे.

कार्यालयात महिलांचा विनयभंग झाल्यास आणि त्या महिलेनं त्यासंदर्भातली तक्रार केल्यास, तिला आता 90 दिवसांची सुट्टी मिळणार आहे. त्या महिलेला वर्षभरात मिळणाऱ्या सुट्ट्यांमध्ये ही सुट्टी धरली जाणार नाही.

सरकारी कर्मचारी महिलेचा विनयभंग झाल्यास त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कार्यालयातल्याच किंवा कार्यालयाच्या बाहेरच्या सदस्यांची समिती नेमण्यात येते. संबंधित महिलेला ही 90 दिवसांची सुट्टी द्यायची की नाही? याचा निर्णय ही समिती घेणार आहे.

एखाद्या महिलेनं कार्यालयात विनयभंगाची तक्रार केल्यास विनयभंग करणारा आरोपी तिच्यावर दबाव आणू शकतो, किंवा धमक्या देऊ शकतो, अशा काही घटना समोर आल्यानंतर तीन महिन्यांच्या सुट्टीचा हा नवा निर्णय घेण्यात आलाय.