www.24taas.com, बंगळुरू
भाजपामधील वादग्रस्त नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी अखेर भाजपाचा निरोप घेतला आहे. मात्र भाजपामधून बाहेर पडताना येदियुरप्पांनाही रडू कोसळलं. आपलं पक्षातील वाढतं वजन पक्षातील अनेकांना सहन झालं नाही. त्यामुळेच माझ्याविरुद्ध षडयंत्र रचलं गेल्याचं येदियुरप्पा म्हणाले. ज्या पक्षाच्या विकासासाठी मी आयुष्य घालवलं, त्या पक्षातूनच आज मला बाहेर पडावं लागत आहे असं येदियुरप्पा म्हणाले.
भाजपाने माझा विश्वासघात केला असल्याचा आरोपही त्यांनी या प्रसंगी केला. ९ डिसेंबर रोजी कर्नाटक जनता पार्टी नामक पक्षाची स्थापना आपण करणार असल्याचाही त्यांनी उद्घोष केला. तसंच आपल्या समर्थकांनी, आमदारांनी अद्याप पक्ष सोडू नये असं येदियुरप्पांनी सांगितलं.
७० वर्षीय येदियुरप्पांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. मात्र त्यानंतर निदान प्रदेशाध्यक्षपद तरी मिळावं, अशी मागणी युदियुरप्पांनी केली. ती विनंतीही भाजपाने धुडकवली. युदियुरप्पांमुळे कर्नाटकात प्रथमच भाजपाची सत्ता आली होती. तसंच दक्षिण भारतात येदियुरप्पांमुळेच भाजपाचा विकास झाला होता. आता युदियुरप्पांच्या नव्या ‘केजपा’ या पक्षामुळे भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.