लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधल्या मोहनलालगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी काही जणांनी एका महिलेसोबत बलात्कार केल्यानंतर तिची हत्या केल्याचं समोर आलंय. हत्येनंतर या महिलेचं निर्वस्त्र शव जवळच्याच एका शाळेत फेकून देण्यात आलं.
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन राज्याचे पोलीस महिनिर्देशक ए एल बॅनर्जी यांनी चौकशीसाठी विशेष टीम बनवल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावाचे चौकीदार अनोखेलाल यांनी मोहनलालगंज पोलीस स्टेशनला या घटनेबाबतची प्राथमिक माहिती दिली होती. गुरुवारी सकाळी साडे सहा वाजता शेताकडे जाताना गावातील प्राथमिक विद्यालयानजिक एका महिलेचं निर्वस्त्र शव त्याच्या दृष्टीस पडलं होतं.
महानिर्देशक कार्यालयानं या घटनेला गंभीरतेनं घेत पोलीस महानिर्देशकांनी (डीजीपी) लखनऊ झोनच्या पोलीस महानिरीक्षकांना घटनास्थळाचं निरीक्षण करण्याचे तसंच पाच डॉक्टरांच्या पॅनलकडून मृत शरीराचं पोस्टमॉर्टेम करण्याचे आदेश दिलेत. या पॅनलमध्ये फॉरेन्सिक विशेष तज्ज्ञांचा समावेश असेल. पोलीस या तरुणीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
धक्कादायक म्हणजे, अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन आज ज्या जबरौली गावात दाखल झाले होते त्या गावाच्या जवळच्याच शाळेत हे महिलेचं मृत शरीर सापडलंय... आणि बिल क्लिंटन येणार म्हणून इथं कडक सुरक्षा लागू करण्यात आली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.