महाराष्ट्रातील पराभूत खासदारांची 'चिंधीचोरी'

लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर दिल्लीतील सरकारी निवासस्थान सोडताना महाराष्ट्रातील काही खासदारांनी निवासस्थानातील सामानाची मोडतोड केल्याचं समोर आलंय. 

Updated: Aug 5, 2014, 02:00 PM IST
महाराष्ट्रातील पराभूत खासदारांची 'चिंधीचोरी' title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर दिल्लीतील सरकारी निवासस्थान सोडताना महाराष्ट्रातील काही खासदारांनी निवासस्थानातील सामानाची मोडतोड केल्याचं समोर आलंय. 

समीर भुजबळ आणि निलेश राणे या माजी खासदारांनी ही मोडतोड केल्याचं समजतंय. दिल्लीतील निवासस्थानी बसवलेल्या अनेक झगमगाटी सोईसुविधा, दिमाखदार दरवाजे, महागडे बेसिन, आरसे, सिंक, नळ, शॉवर निवासस्थान सोडताना काढून नेण्यात आली आहेत. हे करताना या खासदारांनी ही मोडतोड केलीय.

एकेकाळी समीर भुजबळ यांनी ‘१६९, साउथ अॅवव्हेन्यू’ या दिल्लीतील सरकारी निवासस्थानी झगमगाट केला होता. निवासस्थान सोडताना समीर भुजबळ यांनी वॉश बेसिन तर सोडाच पण, दिवाणखाना आणि शयनगृहाला विभागणारा दरवाजादेखील उखडून नेल्याचं समजतंय.

स्नानगृहामधील महागडा आरसा, नळ, शॉवर आदी साहित्य उखडून काढलं गेलंय. स्नानगृहाच्या भिंतीला त्यामुळे मोठे भगदाड पडलेली दिसत आहेत. निलेश राणे यांच्याही ‘97 नॉर्थ अॅडव्हेन्यू’ या निवासस्थानातील बाथरूममधले सिंक नेल्याचं समजतंय. 

या मोडतोडीमुळं नव्या खासदारांना निवासस्थानं देताना विलंब होतोय. या निवासस्थानांची दुरुस्ती करावी लागणार आहे. महाराष्ट्राच्या खासदारांनी अशी मोडतोड करणं खेदजनक असल्याचं गृह वितरण समितीचे अध्यक्ष किरीट सोमय्या यांनी म्हटलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.