www.24taas.com, वॉशिंग्टन
अमेरिकेत भारतीयांवर होणारे हल्ले, गुरूद्वारामध्ये गोळीबार यासारख्या घटनांनी भारतीय नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. तर काल अमेरिकेतील मिसौरी भागात अज्ञात समाजकंटकांनी मशीद पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे. याच मशिदीवर गेल्या ४ जुलै रोजी पेट्रोलबॉम्ब टाकण्यात आला होता.
मिसौरीत असलेले इस्लामिक सेंटर ऑफ जोपलीन आगीत भस्मसात झाले आहे. आग लावण्यात आली तेव्हा सुदैवाने हे सेंटर रिकामे होते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीचा तपास एफबीआय करीत आहे. आग लागली की लावली हे आताच सांगणे शक्य नाही. आग जाणूनबुजून लावण्यात आली असेल तर कठोर कारवाई केली जाईल असे एफबीआयने स्पष्ट केले.
अमेरिकेत विशिष्ट समुदायाला टार्गेट करण्याच्या उद्देशाने हल्ले होत असल्याने तणावाचे वातावरण पसरले आहे. मशिदीच्या आगीनंतर देशातील सर्वच धर्मीयांच्या पवित्र स्थळांची सुरक्षा वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे.