अश्मयुगातही होती समाजात असमानता

वर्णव्यवस्था आणि त्या अनुषंगाने असमानता ही विकसित समाजातील दोष मानली जाते. वर्णव्यवस्थेतून आलेल्या असमानतेमुळे भारतातही मोठ्या प्रमाणावर वाद उफाळून आला. जातीव्यवस्था ही नंतरच्या काळातच जन्माला आली असं मानलं गेलं.

Updated: Jun 5, 2012, 02:24 PM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन

 

वर्णव्यवस्था आणि त्या अनुषंगाने असमानता ही विकसित समाजातील दोष मानली जाते. वर्णव्यवस्थेतून आलेल्या असमानतेमुळे भारतातही मोठ्या प्रमाणावर वाद उफाळून आला. जातीव्यवस्था ही नंतरच्या काळातच जन्माला आली असं मानलं गेलं. मात्र, सात हजार वर्षांपूर्वी अश्मयुगापासूनच वर्णव्यवस्था आणि असमानता अस्तित्वात असल्याचे दाखले मिळाले आहेत.

 

अश्मयुगापासूनच जेव्हा समाजशील प्राणी असणारा मनुष्य एकत्रितपणे समुहाने राहू लागला, तेव्हापासूनच समाजात असमानता निर्माण झाली. मध्य युरोपातील एका दफनभूमीत सुमारे ३००हून अधिक मानवी सांगाड्यांचा अभ्यास केल्यानंतर ब्रिस्टल विश्वविद्यालयाच्या शास्त्रज्ञांना हा शोध लागला. ज्या लोकांच्या ताब्यात सुपीक जमिनी होत्या, त्या लोकांबरोबर हत्यारं आणि अवजारंही दफन करण्यात आली होती.

 

अश्मयुगात जमीन हिच संपत्ती असून त्याच्या मालकीवरून असमानता अस्तित्वात होती, या गोष्टीची ग्वाही मिळते. ज्या लोकांबरोबर दगडी कुऱ्हाडही दफन केली होती, त्या लोकांच्या ताब्यात सुपीक जमिनी होती. मात्र, ज्या लोकांच्या ताब्यात कमी दर्जाच्या आणि काहीशा नापीक जमिनी होत्या, त्यांची प्रेतं मात्र नुसतीच दफन केली होती. ब्रिस्टल विश्वविद्यालयातील पुरातत्व आणि मानववंशशास्त्राचे परोफेसर एलेक्स बेंटले यांच्या मते जमीनींच्या वाटपामध्येही मोठ्या प्रमाणावर असमानता होती.