जगभरात आता ख्रिसमसचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ब्राझिलमध्ये ‘रिओ द जेनेरियो’मधल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या तरंगत्या ख्रिसमस ट्रीला प्रज्वलित करून या सिझनची सुरुवात करण्यात आली. यावेळी आकाशात कलरफुल्ल फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ८ मिनिटे चाललेल्या या आतषबाजीनं अख्खं रिओ द जेनेरियो शहर उजळून निघालं. जवळपास १ लाख लोकांनी या आतषबाजीचा आनंद लुटला. ब्राझिलच्या एका मोठ्या विमा कंपनीनं यावर्षी तरंगता ख्रिसमस ट्री उभारलाय. रिबन्स, स्टार्स आणि ३० लाखांहून अधिक बल्बस् या ख्रिसमस ट्रीला लावण्यात आले होते. ५४२ टन वजनाचा हा कलरफुल्ल स्पार्कलिंग ख्रिसमस ट्री पाण्यात तरंगतांना पाहणं हा अनोखा अनुभव होता. हा तरंगता ख्रिसमस ट्री १९९६ मध्ये सगळ्यात आधी उभारण्यात आला. तेव्हापासून या ट्रीला प्रज्वलित करण्याचा उत्सव, हा ब्राझिलमधल्या तीन मोठ्या उत्सवांपैकी एक मानला जातो. ६ जानेवारीला साजरा होणाऱ्या थ्री किंग्स डे पर्यंत हा ख्रिसमस ट्री असाच प्रकाशात न्हाऊन निघणार आहे.
तर लंडनमध्येही ब्रिटिश प्राईम मिनिस्टर डेव्हिड कॅमरून यांनी ट्राफलगर स्क्वेअरवर ख्रिसमस ट्री प्रज्वलित करून सिझनची खऱ्या अर्थानं सुरुवात केली. यानंतर लंडनमध्ये खऱ्या अर्थानं ख्रिसमस हॉलिडेला सुरुवात झाली. ब्रिटिशांना धन्यवाद देण्यासाठी वेस्टमिनिस्टर सिटीला दरवर्षी ओस्लोकडून असा ख्रिसमस ट्री भेट देण्यात येतो. दुसऱ्या महायुद्धात मदत केल्याबद्दल, ओस्लोक़डून ही मदत केली जाते. १९४७ पासून नॉर्वेचे लोक हा ख्रिसमस ट्री इंग्लंडला भेट देतात. जवळजवळ पाचशे लाईट्सनी नॉर्वेजियन स्टाईलनं या ख्रिसमस ट्रीला सजवण्यात आलं. ६ जानेवारीपर्यंत दररोज हा ख्रिसमस ट्री प्रज्वलित केला जाणार आहे.
जपानमध्येही ख्रिसमससाठी जोरदार तयारी करण्यात आलीय. ख्रिसमससाठी मोठ्या प्रमाणावर बाजारपेठा सजल्यात. टोकियोच्या ‘गिंझा टानका’ ज्वेलरी स्टोअर्समध्ये सोन्याचा ख्रिसमस ट्री ठेवण्यात आलाय. गिंझा स्टोअर्समध्ये ठेवण्यात आलेला हा ट्री तब्बल १२ किलो शुद्ध सोनं वापरून तयार करण्यात आलाय. जपानमधील फ्लॉवर अरेंजमेंट आर्टिस्ट ‘शोगो करियाझाकींनी’ हा सोन्याचा ख्रिसमस ट्री तयार केलाय. ८ पूर्णांक २ फुटांच्या ह्या ख्रिसमस ट्रीला सोन्याच्या १०० रिबन्स, ऑर्किड आणि हार्ट शेपनं सजवण्यात आलंय. सध्याच्या सोन्याच्या किंमतीनुसार जवळपास ७ लाख डॉलर्स इतकी या सोन्याच्या ख्रिसमस ट्रीची किंमत आहे. मात्र, याहूनही अधिक या ट्रीची किंमत असल्याचं गिंझा स्टोअर्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. या हॉलिडे सीझनमध्ये या स्पेशल ख्रिसमस ट्रीची विक्री करण्यात येणार नाही. मात्र, त्यासह तयार करण्यात आलेल्या मौल्यवान वस्तूंची मात्र विक्री करण्यात येणारे
ख्रिसमस साजरा करण्यात झू आणि पार्कसारख्या जागाही मागे नाहीत. अर्जेंटिनामधील एका झू मध्येही असाचा ख्रिसमस फिव्हर आहे. ‘ब्युनोस एरिज’ असं या झूचं नाव आहे. या झूमधील प्राण्यांनादेखील ख्रिसमससाठी खास गिफ्ट्स, त्यांचे आवडते खाद्यपदार्थ, ग्रास भेट म्हणून देण्यात आलेत. त्यामुळं इथले सर्वच प्राणी खूष आहेत. ख्रिसमसनिमित्त सध्या हॉलिडे सीझन आहे. त्यामुळं पर्यटकही मोठ्या संख्येनं या प्राण्यांची मजामस्ती पाहण्यासाठी मुलांना घेऊन येतायेत.