'सरबजीत नव्हे, सुरजीतची होणार सुटका'

सरबजीत सिंगच्या सुटकेवरुन मध्यरात्री पाकिस्ताननं यूटर्न मारलाय. गेल्या २२ वर्षांपासून पाकिस्तानातल्या जेलमध्ये खितपत पडलेल्या सरबजीत सिंगची सुटका होणार नाही. काल रात्री उशीरा राष्ट्राध्यक्षांच्या प्रवक्त्याने सरबजितची सुटका होणार नसून सुरजितसिंगला सोडण्यात येणार असल्याचा खुलासा केलाय.

Updated: Jun 27, 2012, 01:17 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली  

सरबजीत सिंगच्या सुटकेवरुन मध्यरात्री पाकिस्ताननं यूटर्न मारलाय. गेल्या २२ वर्षांपासून पाकिस्तानातल्या जेलमध्ये खितपत पडलेल्या सरबजीत सिंगची सुटका होणार नाही. काल रात्री उशीरा राष्ट्राध्यक्षांच्या प्रवक्त्याने सरबजितची सुटका होणार नसून सुरजितसिंगला सोडण्यात येणार असल्याचा खुलासा केलाय.

पीटीआयच्या हवाल्यानं हे वृत्त आलंय. काल संध्याकाळच्या सुमारास पाक जेलमध्ये असलेल्या सरबजीत सिंगची फाशीची शिक्षा पाक राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी जन्मठेपेत बदलल्याचं वृत्त आलं होतं. आणि अवघ्या काही तासांतच पाकनं पलटी मारली. सरबजीत ऐवजी सुरजित नावाच्या भारतीय कैद्याची सुटका होणार असल्याची माहिती पाक राष्ट्राध्यक्षाचे प्रवक्ता फरहतुल्ला बाबर यांनी दिलीय. सुटका करण्यात येणार असलेला सुरजितसिंगला तीस वर्षांपूर्वी हेरगिरीच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती.

सरबजीतची सुटका होणार असल्याची बातमी ऐकून सरबजीतच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं होतं. मात्र, अवघ्या काही तासांतच ही बातमी चुकीची ठरली आणि सरबजीतच्या कुटूंबियांच्या आशेवर पुन्हा एकदा पाणी पसरलं. आमच्या भावनांशी खेळ असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी सरबजीत सिंगची बहिण दलबीर कौर हिनं दिलीय. २५ ऑगस्ट १९९० रोजी चुकून सीमापार गेलेल्या सरबजितवर १९९० लाहोर बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलीय. या आरोपाखाली त्याला फाशीची शिक्षाही सुनावण्यात आलीय. मात्र, २००८मध्ये तत्कालीन पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्या हस्तक्षेपामुळे सरबजीतसिंगची फाशी पुढे ढकलली गेली. गेल्या २२ वर्षांपासून सरबजित हा पाकिस्तानच्या जेलमध्ये आहे.