दक्षिण सुदानमधून 156 भारतीयांची सुटका

दक्षिण सुदानमधून भारतीयांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. सुटका झालेले 156 नागरिक इंडियन एअरफोर्सच्या विमानानं भारतात दाखल झालेत.

Updated: Jul 15, 2016, 08:04 PM IST
दक्षिण सुदानमधून 156 भारतीयांची सुटका  title=

नवी दिल्ली : दक्षिण सुदानमधून भारतीयांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. सुटका झालेले 156 नागरिक इंडियन एअरफोर्सच्या विमानानं भारतात दाखल झालेत. या अडकलेल्या लोकांना आणण्यासाठी स्वतः परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग सुदानला गेले होते. तामिळनाडू आणि केरळमधल्या भारतीयांबरोबरच यामध्ये दोन नेपाळी नागरिकांचाही समावेश आहे. 

दक्षिण सुदानमध्ये जिथे युद्ध सुरू आहे त्या जुबामध्ये अजूनही पाचशे भारतीय नागरिक आहेत. भारतीय वायुसेनेचं विमान जुबामध्ये भारतीयांची सुटका करण्यासाठी गेलं असता 156 भारतीय या विमानाबरोबर आले. तर तीस ते चाळीस लोकांनी खाजगी फ्लाईटसची तिकीटं बुक केली आहेत. 

उरलेल्या 300 भारतीयांनी नोकरी-धंद्याच्या कारणामुळे भारतात परत यायला नकार दिला आहे. दक्षिण सुदानमध्ये फुटीरतावादी आणि सरकारच्या जवानांमध्ये प्रचंड धुमश्चक्री सुरू आहे. त्यामुळे सुदानमधून भारतीयांनी बाहेर पडावं, असं आवाहन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट केलं होतं. त्यानंतर भारतीय वायुदलाच्या मदतीनं भारतीयांची सुखरुप सुटका करण्यात आली. व्ही.के.सिंग यांनी भारतीयांच्या या सुटकेचे फोटो आणि व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केले आहेत.