फ्लोरिडा : अमेरिकेमधील फ्लोरिडामधील डिस्ने रिसॉर्टच्या पाण्याच्या प्रवाहात एक मगर घुसली.. आणि एवढ्यावरच न थांबता त्या मगरीने एका दोन वर्षाच्या निष्पाप मुलाचा बळी घेतला. या सगळ्या प्रकारानंतर संपुर्ण डिस्ने रिसोर्टमध्ये खळबळ माजलीय.
फ्लोरिडाचे 'डिस्ने वर्ल्ड' हे मंगळवारी घडलेल्या घटनेतून अजूनही सावरलेलं नाही. जे काही घडलंय ते मुळात घडलचं कसं? हा प्रश्न सर्वांनाच पडलाय.
अवघ्या दोन वर्षाचा लेन ग्रेव्स मगरीच्या हल्ल्याला बळी पडलाय. लेन आपल्या आई वडिलांसोबत तलावाच्या बाजुला खेळत होता. तेव्हा एक बेसावध क्षणी कुठून तरी एक मगर आली आणि त्या निष्पाप लेनला तीनं पाण्यात खेचून नेलं...
लेनचे वडिल मॅथ्यु यांनी मगरीपासून आपल्या मुलाला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला लेनच्या वडिलांची आणि त्या मगरीची झटापटही झाली. लेनच्या आईनेही लेनला वाचवायचा प्रयत्न केला. पण माता पित्यांचे प्रयत्न अखेर निष्फळ ठरले.
आई वडिलांनी लाईफ गार्डला हाकाही मारल्यात, पण तो फार दूर असल्याने त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
तोपर्यंत मगरीने लेनला पाण्यात खेचून नेलं होतं. लेनला मगरीनं पकडल्यानंतर तलावात शोधाशोध सुरु झाली. संपूर्ण डिस्नेलॅंडला बंद करण्यात आले. या शोध मोहीमेत वनाधिकाऱ्यांनी पाच मगरीला पकडून मारले. नेमक्या कुठल्या मगरीने मुलाला खाल्लय का? यासाठी ही शोधमोहीम घेण्यात आली.
पण, कुठल्याही मगरीच्या पोटात लेन सापडला नाही. संपूर्ण तलावात लेनची शोधमोहीम सुरु होती. शोध मोहीमेत फार वेळाने लेनचा मृतदेह गाळात रुतलेला आढळला. लेनचा मृतदेह शाबूत होता. त्याला मगरीने खालेलं नव्हतं.
लेनचे आईवडील अजूनही या धक्क्यातून सावरलेले आहेत. फ्लोरी़डातल्या अन्य नद्या आणि तलावात मगरी नेहमीच आढळतात. डिस्नेलॅंडमधील तलाव हे मानवनिर्मित आहेत. मग यात मगर आलीच कशी? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.