शांघाय : आज मोबाईलवर अनेक नवीन नवीन अॅप पाहायला मिळतात. अॅपच्या माध्यमातून अनेक कामं सोपी झाली आहेत. पण चीनमध्ये तर एका अॅपमुळे चक्क २६० बेपत्ता मुलांचा शोध लागला आहे. चीनच्या सुरक्षा मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. चीनमध्ये मुलांचे अपहरण होण्याचं प्रमाण अधिक आहे. चीनमध्ये दरवर्षी २ लाखांहून अधिक लहान मुले बेपत्ता होतात. किडनी आणि सेक्स रॅकेटसाठी या मुलांचे अपहरण केलं जात असल्याचं समोर आलंय.
मुलांचा शोध घेण्यासाठी चीन सरकारने Tuanyuan हा मोबाईल अॅप लाँच केला होता. या अॅपच्या मदतीने वर्षभरात २५० बेपत्ता मुलांचा शोध लागला आहे. २०१५ मध्ये ‘Tuanyuan’ हे अॅप लाँच करण्यात आलं होतं. या अॅपवर आतापर्यंत २८० बेपत्ता मुलांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यातल्या २६० जणांचा शोध घेण्यात यश आलं आहे. २६० पैकी १८ मुलांची तस्करी करण्यात आली होती. या मुलांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचा वापर करण्यात आला होता. अनेक संस्थानी बाटलीवर या बेपत्ता मुलांचा फोटो लावून त्यांच्या शोध लावण्याचा प्रयत्न केला होता.