www.24taas.com, नवी दिल्ली
अफजल गुरुच्या फाशीचा निषेध पाकिस्तानमध्ये करण्यात आलाय. इतकंच नाही तर गुरुच्या फाशीच्या निषेधार्थ पाकिस्तानी खासदारांनी `मातम`ही पाळला.
श्रीनगरमधील सीआरपीएफच्या कॅम्पवर भयंकर दहशतवादी हल्ल्याच्या घटनेला २४ तास उलटत नाहीत तोच पाकिस्ताननं आणखी एक नवा वाद निर्माण केलाय. पाकिस्तानच्या संसदेत गुरुवारी भारतीय संसद हल्ल्यातील दोषी अफझल गुरुच्या फाशीचा ‘मातम’ पाळण्यात आला. अफजल गुरुच्या फाशीच्या निषेधाचे सूर पाकिस्तान संसदेत उमटले. अफझलचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला गेला पाहिजे, असा अनाहूत सल्लाही पाकिस्तान खासदारांनी भारताला दिलाय.
पाकिस्तान संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या नॅशनल असेंब्लीची पाच वर्षांची मुदत दोन दिवसांनी संपत आहे. शेवटच्या अधिवेशनात ‘जमात उलेमा - ई – इस्लामी’चा प्रमुख मौलाना फजलूर रहेमान याने अफझलच्या फाशीचा निषेधाचा ठराव मांडला, तसेच कश्मीरातील परिस्थितीवर चिंताही व्यक्त करण्यात आली. हा ठराव पाक संसदेत एकमताने मंजूर झाला. अफझलचा तिहारमध्ये पुरलेला मृतदेह बाहेर काढून तो त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.