हाफीज सईदच्या उलट्या बोंबा, म्हणाला कराची हल्ल्यामागे मोदी

मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदनं कराचीतील दहशतवादी हल्ल्यासाठी थेट भारताला जबाबदार ठरवलंय. मोदींच्या नवीन सुरक्षा पथकानंच हा हल्ला केल्याचे मुक्ताफळंही त्यानं उधळली आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 9, 2014, 03:16 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदनं कराचीतील दहशतवादी हल्ल्यासाठी थेट भारताला जबाबदार ठरवलंय. मोदींच्या नवीन सुरक्षा पथकानंच हा हल्ला केल्याचे मुक्ताफळंही त्यानं उधळली आहे.
दहशतवादी हल्ले घडवणाऱ्या हाफीजनं भारतालाच दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार ठरवणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच म्हणावं लागेल, अशी संतप्त प्रतिक्रिया भारतातून व्यक्त होत आहे.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदनं सोमवारी ट्विटरवर कराची विमानतळावरील दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केलं. कराचीतील दहशतवादी हल्ल्याची तेहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेनं जबाबदारी स्वीकारली असूनही हाफीज म्हणतो, दहशतवाद्यांचा सामना करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याच्या जवानांना आमचा सलाम.
या हल्ल्यामागे भारतातील नरेंद्र मोदींचे नवीन सुरक्षा पथक जबाबदार आहेत. संपूर्ण पाकिस्तानला माहीत आहे आपला खरा शत्रू कोण. पाकिस्तान सरकारनं आता तरी भारताविरुध्द कणखर भूमिका घ्यावी, असं हाफीज सईद म्हणतो.
हाफीज प्रमुख असलेल्या जमात उद दावानंही ट्विटरद्वारे मोदी सरकारलाच या हल्ल्यासाठी जबाबदार ठरवले आहे. हाफीजच्या या ट्विटवरुन भारतातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.