कॉलोरेडो: आय फोन परत घेतला म्हणून १२ वर्षाच्या मुलीनं लागोपाठ दोन वेळा आईची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना अमेरिकेत घडली आहे. दुसऱ्या प्रयत्नानंतर मुलीवर संशय आल्यावर मुलीच्या आईनं पोलिसांशी संपर्क साधला आणि या सर्व प्रकरणाचा खुलासा झाला. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असून तिला उपचारानंतर घरीदेखील सोडण्यात आलं आहे.
अमेरिकेतील कोलोरेडो इथं राहणाऱ्या एका महिलेनं तिच्या १२ वर्षाच्या मुलीकडील आयफोन परत घेतला होता. आईच्या या निर्णयावर मुलगी संतापली आणि तिनं थेट आईच्या हत्येचा कट रचला. २ मार्च रोजी तिनं आईच्या ज्यूसमध्ये ब्लीच टाकलं. ज्यूस पित असताना महिलेला ग्लासमध्ये ब्लीचचा वास आला आणि तिनं ज्यूस फेकून दिलं. मुलीनं ग्लास नीट न धुतल्यानं ब्लीचचा वास येत असावा असं तिला वाटलं.
मात्र दोन दिवसांपूर्वी तिला ज्यूसमध्ये पुन्हा ब्लीचचा वास आला. यानंतर तिनं या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि चौकशीत तिनं गुन्ह्याची कबुली दिली. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असून मुलीची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे. तिच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.