बेनझीर हत्या प्रकरण; मुशर्रफ यांना अटक होणार?

पाकिस्ताननं इंटरपोलला पाठवलेल्या एका पत्रात माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना अटक करण्याचे आदेश दिलेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 14, 2012, 05:00 PM IST

www.24taas.com, इस्लामाबाद
पाकिस्ताननं इंटरपोलला पाठवलेल्या एका पत्रात माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना अटक करण्याची मागणी केलीय. परवेझ मुशर्रफ यांना २००७ साली झालेल्य बेनझीर भुत्तो हत्या प्रकरणात चौकशी आयोगाला सहकार्य न करण्याबद्दल न्यायालयानं फरार म्हणून घोषित केलं होतं.
बेनझीर भुत्तो हत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सांघिक चौकशी एजन्सीनं अटक वारंटसोबतच काही पुरावेही जोडले आहेत. या पत्राला काल इंटरपोलकडे पाठवण्यात आलंय. असंच एक पत्र या चौकशी एजन्सीनं फ्रान्स स्थित इंटरपोलनं यापूर्वीही पाठवलं होतं. पण, काही ठोस पुराव्यांशिवाय पाठवलेल्या या पत्राला इंटरपोलनं केराची टोपली दाखविली होती.
‘दि एक्सप्रेस ट्रिब्यून’च्या म्हणण्यानुसार काल पत्रासोबत पाठवल्या गेलेल्या पुराव्यांत अमेरिकन पत्रकार मार्क सिगल याचा जबाब तसचं मुशर्रफ यांच्याद्वारे माजी पंतप्रधान भुत्तो यांना पाठवलेल्या एका ई-मेलचाही समावेश आहे. ‘एफआयए’च्या विशेष वकिलांनीही या बातमीला दुजोरा दिलाय.
याअगोदर ब्रिटिश सरकारनं मुशर्रफ यांना पाकिस्तानच्या ताब्यात देण्याच्या प्रस्तावाला लाथाडलंय. ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यासंदर्भात कोणतंही पाऊल उचलण्यास ते असक्षम आहेत. कारण दोन्ही देशांमध्ये देवाण-घेवाणीहीचा असा कोणत्याही प्रकारचा कायदा अस्तित्वात नाही.