लंडन : दहशतवादी संघटना ‘इसिस’नं (ISIS) पुन्हा एकदा एका निरपराध व्यक्तीचं मुंडकं छाटून त्याची हत्या केल्याचा दावा केलाय. इसिसनं जाहीर केलेल्या व्हिडिओमध्ये ब्रिटनचा नागरिक असलेल्या आणि बंधक बनवलेल्या एलन हेनिंग याचं शीर धडापासून वेगळं करण्यात आल्याचं दिसतंय.
हेनिंग याला इसिसच्या दहशतवाद्यांनी गेल्या वर्षी सीरियामध्ये बंधक बनवलं होतं. उत्तर इंग्लंडमध्ये टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करणार्या हेनिंग सामान पोहचवण्यासाठी जात असताना त्याला दशतवाद्यांनी ताब्यात घेतलं होतं.
हेनिंग हा दुसरा ब्रिटिश नागरिक ठरलाय ज्याचं इसिसनं शीर धडावेगळं केलं गेलंय. यापूर्वी ब्रिटनच्या डेव्हिड हेन्स याच्या शिरच्छेदाचा व्हिडिओ इसिसनं जाहीर केला होता.
आत्तापर्यंत इसिसनं चार जणांचे मुंडके छाटल्याचा दावा करत व्हिडिओ जाहीर केलेत. सर्वात प्रथम अमेरिकन पत्रकार जेम्स फॉली त्यानंतर स्टीव्हेन्स सोटलॉफ नंतर हेन्स आणि आता हेनिंग... यांच्या शिरच्छेदाचे व्हिडिओ सार्वजनिकरित्या शेअर करण्यात आलेत.
या व्हिडिओच्या शेवटी इसिसच्या दहशतवाद्यानं आणखी एक बंधक पीटर कासिंग यालाही दाखवलंय. पुढच्या वेळेस कासिंग याचंही शीर धडावेगळं करण्यात येईल, असा दावा यात इसिसनं केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.