ब्रुनेई: आता पाहुयात एक बातमी अशा लग्नसोहळ्याची ज्यात सोने, हिरे आणि पाचूंची उधळण होती. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणल्या जाणाऱ्या ब्रुनेईच्या सुल्तानाच्या मुलाचा लग्नसोहळा असा काही दणक्यात पार पडला की ज्याची कितीतरी दिवस जगभर चर्चा होतेय.
प्रिन्स अब्दुल मलिक आणि आणि डेयांग्यू रबी तुल अदावियाह पेंगिरान यांचा विवाहसोहळा. प्रिन्स मलिक आहे ब्रुनेईचे सुल्तान हाजी हसन अल बोलकिया यांचा सर्वात लहान मुलगा. प्रिन्स मलिक यांची नुतन पत्नी पेंगिरान व्यवसायाने डेटा अॅनालिस्ट आहे. हा स्वागत समारंभ ब्रुनेईची राजधानी बंडार सेरी बेगावन इथं पार पडला.
स्वागत समारंभ ज्या राजवाड़यात झाला त्या राजवाडयाच्या भिंतींना सोन्याच्या पाण्याचा मुलामा देण्यात आला होता. विशेष म्हणजे या शाही लग्नसोहळ्यात विवाहित जो़डप्याला जे पुष्पगुच्छ देण्यात आले तेही दागिन्यांनी मढवलेले होते. खास आकर्षण ठरले ते नववधूनं परिधान केलेले खास बूट. या बूटांची किंमत लाखोंमध्ये होती. नववधूनं परिधान केलेला पोषाखही सोने आणि हिऱ्यांनी मढवलेला होता.
ब्रुनेईचे सुलतान हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. त्यामुळं त्यांच्या मुलाचा विवाह असा शाही होता. सध्या या सुल्तानाच्या तिजोरीत कोटयवधींची मालमत्ता आहे. दक्षिण आशियातील एक तेलसंपन्न देश म्हणून ब्रुनेईची ओळख आहे. ब्रुनेईच्या सुलतानाच्या गाडयांच्या ताफ्यामध्ये तब्बल सात हजार गाडयांचा समावेश असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळं आपल्या मुलाच्या लग्नात सुलतानानं अशी सोने, हिरे आणि पाचुंची उधळण केली.
नुरुल पॅलेसमध्ये पार पडलेला हा लग्न सोहळा सध्या जगभर गाजतोय तो अशा शाही थाटामुळं. नुरुल पॅलेसही अतिभव्य आहे.. या पॅलेसमध्ये तब्बल एक हजार सातशे ८८ राजेशाही खोल्या आहेत. या सोहळ्याला मलेशिया आणि सौदी अरेबियासह सात देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित होते. असा हा शाही विवाहसोहळा... ज्याची चर्चा हा सोहळा पार पडला तरी सुरुच आहे...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.