पगार मागितला म्हणून सौदी मालकानं तिचा हातच कापून टाकला

सौदी अरबच्या एका मालकानं आपल्या भारतीय नोकर महिलेचे हात कापून टाकल्याची क्रूर घटना उघड झालीय. भारत सरकारनंही या घटनेची तातडीनं दखल घेतलीय.

Updated: Oct 9, 2015, 04:20 PM IST
पगार मागितला म्हणून सौदी मालकानं तिचा हातच कापून टाकला title=

नवी दिल्ली : सौदी अरबच्या एका मालकानं आपल्या भारतीय नोकर महिलेचे हात कापून टाकल्याची क्रूर घटना उघड झालीय. भारत सरकारनंही या घटनेची तातडीनं दखल घेतलीय.

भारतानं या घटनेची निंदा करत सौदी अरब सरकारला या घटनेत 'हत्येच्या प्रयत्नाचा' गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. 

पीडित महिला ही मूळची तामिळनाडूची राहणारी आहे. आपल्या चाकरीबद्दल जेव्हा या महिलेनं आपल्या मालकाकडे तक्रार केली तेव्हा या क्रूर मालकानं तिचे हातच छाटून टाकलेत. गेल्या आठवड्यात ही घटना घडल्याचं समजतंय. 

अधिक वाचा -  सौदी अधिकाऱ्याची भारतीयाला क्रूर मारहाण (व्हिडिओ पाहा)

50 वर्षीय कस्तूरी मणिरत्नम असं या पीडित महिलेचं नाव आहे. सध्या ती रियादच्या हॉस्पीटलमध्ये गंभीर परिस्थितीत भर्ती आहे. कस्तूरीला सौदीहून परत भारतात आणण्याची मागणी तिच्या कुटुंबीयांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केलीय.

कस्तूरीची बहिण विजयाकुमारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वी घरगुती कामासाठी सहाय्यक म्हणून कस्तूरी सौदीला गेली होती. घरात आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला स्थानिक अधिकाऱ्यांसमोर वाचा फोडली म्हणून मालकीन तिच्यावर नाराज होती. तिला जेवणंही दिलं जात नव्हतं. आपल्याला वेतन न मिळाल्याची तक्रार कस्तूरीनं केली तेव्हा तिच्या मालकानं तिचा हातच कापून टाकला. या घटनेची माहिती कस्तुरीच्या भारतातील कुटुंबीयांना 29 सप्टेंबर रोजी मिळाली.

रियाद स्थित भारताच्या दूतावासनं सौदी विदेश कार्यालयासमोर हे प्रकरण मांडून दोषी व्यक्तीला कडक शिक्षा देण्याची मागणी केलीय, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी म्हटलंय. 

नवी दिल्लीत 12 -13 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या श्रम मुद्यावर जॉईंट वर्किंग ग्रुपमध्येही हे प्रकरण उचलून धरण्यात येणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.