न्यूयॉर्क : करिअर आणि घर सांभाळताना मोठी कसरत होते, असे मत पेप्सिकोच्या सीईओ इंद्रा नुयी यांनी कोलोरॅडोच्या अस्पेनआयडियाज फेस्टिव्हलमध्ये व्यक्त केले.
इंद्रा नुयी म्हणाल्यात, 'तुम्ही भलेही 'पेप्सिको'च्या सीईओ असाल, पण घरात प्रवेश करताच तुम्ही कुणाची तरी पत्नी असता, मुलगी असता, सून असता किंवा आई असता. आणि ही जागा अन्य कुणीही घेऊ शकत नाही. त्यामुळे बाहेरच्या जगात तुम्ही कसलाही मुकुट मिळवा. घरात जाताना तो बाहेरच ठेवावा लागतो, आणि मी तरी हा मुकुट कधी पाहिलेला नाही'
'महिला एकाच वेळी सर्व गोष्टी मिळवू शकतात का,' असा प्रश्न नुयी यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी थेट विधान केलं. सगळ्या गोष्टी एकाच वेळी मिळवणे अवघड असते, आपण सगळे मिळवले आहे, हे निव्वळ सोंग असते. काम आणि वैयक्तिक आयुष्याचा ताळमेळ घालणे खरोखर अवघड असते. माझ्या मुली मला चांगली आई मानत असतील का? याबाबत माझ्या मनात शंका आहे. गेल्या ३४ वर्षांत अपराधीपणाच्या भावनेने अनेकदा मेल्याहून मेल्याची भावना आली. मुलींच्या शाळेतल्या अनेक कार्यक्रमांना कामामुळे हजर राहता आले नाही, अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.
कौटुंबिक जबाबदाऱ्या संभाळताना आधी अपराधी वाटत असे, पण नंतर परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकले. करिअरचं घड्याळ आणि जैविक घड्याळ एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालतं, असं त्या म्हणाल्यात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.