शिकागो : अमेरिकेतील निक वालेंदा (३५) या तरुणानं दोन गगनचुंबी इमारतीवरुन डोळे बांधून सुरक्षेचे कोणतेही उपाय न योजता चालण्याचा विक्रम केला असून, त्याचं हे साहस आणि थरार पाहण्यास हजारो लोक जमले होते.
सुरक्षा जाळे न लावता दोन इमारतीमध्ये दोरी बांधून डोंबाऱ्याच्या खेळाप्रमाणे त्यानं दोरीवरुन चालण्याचा उपक्रम केला. अत्यंत धाडसानं हा उपक्रम रविवारी रात्री पार पाडल्यानंतर आपल्याला विलक्षण आनंद झाला आहे, असं त्यानं पत्रकार परिषदेत सांगितलं.
हाय वायर आर्टिस्ट म्हणून निक वालेंदा प्रसिद्ध आहे. त्यानं शिकागो नदी ताणलेल्या दोरीवरुन ६.५२ मिनिटात पार केली. शिकागोमधील मरिना सिटी टॉवर्समध्ये दोरी बांधून त्यानं हा थरार पूर्ण केला.
उंचावर बांधलेल्या दोरीवरुन चालणं हा वालेंदा कुटुंबियाचा हा कौटुंबिक व्यवसाय आहे. त्याचे वडील, आजोबा हाच व्यवसाय करत असत. त्याचे पणजोबा कार्ल यांचा असंच साहस करताना दोरीवरुन पडून १९७८ साली निधन झालं आहे.
मरीना सिटी टॉवर्सच्या पश्चिमेकडील टॉवरवरुन १३८ फुटांवर नदीच्या दुसऱ्या बाजुला दुसऱ्या इमारतीला २८ मीटर उंचीवर दोरी बांधण्यात आली होती. थंडगार, बोचरं वारं वाहात होतं. आय लव्ह शिकागो, अँड शिकागो डेफिनेटली लव्हज् मी असं तो दोरीवरुन चालताना म्हणत होता. खाली उभा असलेला जमाव त्याला पुढं जाण्यासाठी समर्थनाच्या घोषणा देत होता. १.१७ मिनिटांत त्यानं दोन इमारतीमधील अंतर पार केलं, तर शिकागो नदीची लांबी त्यानं ६.५२ मिनिटात पूर्ण केली होती.
पाहा हा थरारक व्हिडिओ-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.