युरोप : तुर्कीमधील आयलानच्या घटनेमुळे केवळ इराक, सीरियातला प्रश्नच समोर आलाय असं नाही... तर जगभरातून युरोपमध्ये येणाऱ्या निर्वासितांचं हाल देशांतर केल्यावरही सुरूच असतात.. हंगेरीमध्ये घडलेल्या घटनेनं हेच अधोरेखित केलंय.
निष्प्राण झालेल्या आयलानच्या या फोटोनं सगळं गज हादरलंय. इसिसच्या छळाला कंटाळून सीरियातून पळ काढताना अतिशय धोकादायक अशा सागरी सफरीत अयलानचा अंत झाला. मात्र हा धोकादायक प्रवास पूर्ण झाला, तरी युरोपच्या भूमीवर पाय ठेवताच या शरणार्थींसमोर नव्या समस्या उभ्या राहतात. ही दोन दृष्य सीरियन शरणार्थींच्या व्यथांची कहाणी सांगतात.
पहिलं दृष्य आहे आयलान कुर्दीचं. आता त्याचं दफन करण्यात आलंय. मात्र हे दुसरं दृष्य आहे सीरियासह अन्य देशांमधून युरोपात आलेल्या शरणार्थींची हालाखी दाखवणारं... आपली पत्नी आणि मुलांचे प्राण वाचावेत यासाठी रेल्वे रुळांवर झोपणाऱ्या पित्याची ही दृष्यं आहेत... त्याला अखेर बेड्या ठोकून कुटुंबापासून दूर नेलं गेलं...
हंगेरीची राजधानी बुडापेस्टमधल्या केलेटी स्टेशनवरचा हा व्हिडिओ आहे. सीरियामधून आलेल्या शरणार्थींना गाडीत बसवून ऑस्ट्रीयाच्या सीमेवर सोडण्यात येईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र गाडी ऑस्ट्रियाजवळ नव्हे, तर डिटेन्शन कॅम्पमध्ये जाणार असल्याचं समजल्यावर एकानं मुलाबाळांसह रेल्वे ट्रॅकवर उडी घेतली. आपल्याला डिटेन्शन कॅम्पमध्ये पाठवलं जाऊ नये, इतकीच त्याची मागणी होती.
युरोपमधल्या शरणार्थींचं संकट नेमकं काय?
- सीरिया, इराक, अफगाणिस्तान आणि काही आफ्रिकन देशांत यादवीमुळे अऩेक जण देशोधडीला लागलेत
- यंदा जानेवारी ते ऑगस्ट या 8 महिन्यांत युरोपियन देशांच्या सीमांवर तब्बल साडेतीन लाख शरणार्थी पोहोचलेत.
- इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनच्या आकडेवारीनुसार यंदा ग्रीस आणि इटलीत येण्याच्या प्रयत्नात 2 हजार 600 जणांना भूमध्य समुद्रात जलसमाधी मिळालीये.
- यंदा जुलैपर्यंत 4 लाख 38 हजार लोकांनी युरोपियन देशांकडे आसरा मागितलाय.
- गेल्यावर्षीही 5 लाख 71 जण युरोपमध्ये आले होते.
युरोपियन देशांसाठी शरणार्थींचा कोटा निश्चित केला जाईल, असं जर्मनी आणि फ्रान्सनं जाहीर केलंय. लोकांना ये-जा करायला सोपं व्हावं, या उद्देशानं नियमही शिथील करण्यात येणार आहेत. युरोपनं 2 लाख शरणार्थींना आसरा द्यायलाच हवा, असं संयुक्त राष्ट्रांनीही स्पष्ट केलंय. असं असलं तरी या शरणार्थींची अवस्था बघता त्यांना लवकरच दिलासा मिळेल, अशी शक्यता दिसत नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.