मुंबई : तुर्कस्तानच्या किनाऱ्यावर अयलान कुर्दीच्या मृतदेहानं जगाच्या माणुसकीसमोर अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित केली आहेत. सारिया आणि इराकमध्ये इसिसच्या अत्याचारांमुळे देशोधडीला लागणाऱ्या लाखो नागरिकांच्या वेदना आयलानच्या एका छायाचित्रात सामवल्यात.
आपल्या वडिलांच्या या लाडक्यानं आपली आई आणि भावासह जगाचा निरोप घेतलाय. मात्र जाता-जाता या चिमुकल्यानं जगाला एका दुःखाच्या धाग्यात जखडून टाकलंय. आज प्रत्येकाचे डोळे पाणावलेत. अश्रूंचे पाट वाहतायत..
छायाचित्र नेहमीच खरं बोलतात, असं म्हणतात... हे छायाचित्रही जगाला एक प्रश्न विचरतंय... माझी काय चूक होती? अवघ्या ३ वर्षांच्या अयलान कुर्दीची ही छायाचित्र... सीरियात जन्मलेला-वाढलेला... रोज सकाळी आपल्या बाबांकडे खेळण्यासाठी हट्ट धरणारा...
माझी मुलं जगातली सर्वात सुंदर मुलं होती. मला सांगा. जगात असं कोण आहे ज्याच्यासाठी त्याची मुलं अनमोल नसतील. रोज सकाळी मला खेळण्यासाठी उठवायचे ते. पण आता सगळंच संपलंय. आता तीन वर्षांचा हा निरागस आयलान चिरनिद्रा घेतोय. या झोपेतून आता तो कधीच उठणार नाहीये. या छायाचित्राचं खरं दुःख अनुभवण्यासाठी काही गोष्टी आपल्याला खरी परिस्थीती जाणून घेतली पाहिजे.
इसिसचा नंगानाच
इराक आणि सीरियामध्ये सुरू असलेला इसिसचा नंगानाच आता सगळ्यांनाच माहिती झालाय. अतिरेक्यांच्या भीतीनं आपला जीव वाचवून हजारो लोकं देशोधडीला लागलेत. आपली घरंदारं सोडून, जीव धोक्यात घालून समुद्रमार्गे देश सोडून पळून जातायत. आपला देश सोडून पळून चाललेल्या लोकांना जलसमाधी मिळाल्याच्या बातम्या वरचेवर ऐकू येतायत.
शहर सोडण्याचा निर्णय
सीरियाच्या कोबेन शहरात राहणारे अब्दुल्ला कुर्दी गेल्या वर्षी अतिरेक्यांच्या भीतीनं देशाची सीमा ओलांडली... सोबत पत्नी रेहाना, मोठा मुलगा गालिब आणि धाकटा आयलान होते. तुर्कस्तानच्या शरणार्थी शिबिरात त्यांनी आश्रय घेतला, मात्र त्यांना त्या देशाचं नागरिकत्व मिळालं नाही. त्यामुळे अब्दुल्लांनी कॅनडामध्ये शरण मागितली होती. त्याला यश आलं नाही. मग त्यांनी समुद्रामार्गे ग्रीसच्या कोव्ह बेटावर जाण्याचा निश्चय केला.
मला पाण्याची भीती वाटतेय!
मला अब्दुल्लाचा फोन आला होता. तो म्हणाला की, मी एकटा गेलो तर माझी बायको मुलांना एकट्यानं सांभाळू शकणार नाही. तिला तुर्कस्तानात काम करता येणार नाही. आपल्याला पाण्याची भीती वाटते, असं त्याच्या बायकोनं मला आठवडाभरापूर्वी सांगितलं. तिला पोहोता येत नव्हतं. तिला जायचं नव्हतं. पण अखेर सगळ्या कुटुंबानं जाण्याचा निर्णय घेतला.
मंगळवारी, १ सप्टेंबरला कुर्दी कुटुंब तुर्कस्तानच्या बोर्डम बीचवरून ग्रीसच्या कोव्ह बेटावर जाण्यासाठी एका छोट्या नावेतून निघाले. बोटीनं ग्रीसकडे कुच केली खरी. पण अवघ्या काही मिनिटांतच समुद्रामध्ये मोठ्या लाटा उठायला सुरूवात झाली. आणि डोळ्याची पात लवते न लवते तोच रात्रीच्या अंधारात अयलान, त्याची आई आणि भाऊ काळाच्या उदरात गडप झाले.
मी त्यांना वाचवू शकलो नाही
अब्दुल्लांनी आपल्या कुटुंबाला वाचवण्याची धडपड केली खरी. पण त्यांची पकड काळ थांबवू शकली नाही. बोटीमध्ये आम्ही 13 जण होतो. आम्हाला निघून 4-5 मिनिटंच झाली होती आणि अचानक उंच लाटा उसळल्या. बाकीच्यांनी आम्हाला नावेतच सोडून समुद्रात उड्या घेतल्या. मी बोट चालवायचा प्रयत्न केला... पण मी तुफानी लाटांचा सामना करू शकलो नाही... मी बायको आणि मुलांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण शक्य झालं नाही. माझ्या डोळ्यासमोर एकापाठोपाठ एक ते मृत्युमुखी पडले.
बुधवारी सकाळी या सर्वांचे मृतदेह तुर्कस्तानच्या त्याच बीचवर वाहून आले... याच किना-यावर कुर्दी कुटुंबानं नव्या आयुष्याची स्वप्न बघत समुद्रात नाव लोटली असेल. ज्या बोटीतून 3 वर्षांचा अयलान आपले आईवडील आणि भावासह निघाला होता ती बोट रिकामीच परत आली... तेव्हा अयलान आणि गालिब जीवनाशी अखेरची झुंज हारले होते...
आयलानची सायकलची इच्छा अधूरी...
त्यांनी हे जग सोडून जायला नको होतं. एका चांगल्या आयुष्याचा शोध घेत ते निघाले होते. असं व्हायला नको होतं. दोन आठवड्यांपूर्वी आयलाननं मला विचारलं होतं, की आत्या, तू मला सायकल घेऊन देशील? सगळ्या मुलांकडे असते, तशी सायकल त्याला हवी होती. मी माझ्या भावाला सांगितलं होतं, की मी जास्त पैसे पाठवीन. त्याला सायकल घे.
बुधवारी या दोन चिमुकल्यांच्या मृतदेहांची छायाचित्रं जगासमोर आली आणि तीव्र प्रतिक्रिया उमटल्या... झी 24 तासनं देखील ही दृष्य जशीच्या तशी दाखवण्याचा निर्णय घेतला... इसिसचा दहशतवाद, सीरियातली स्थिती, युरोपमधल्या शरणार्थींचे प्रश्न प्रकर्षानं जगासमोर यावेत... दहशतवादाविरुद्ध जगानं एकजुटीनं उभं रहावं... इतकं जरी झालं, तरी अयलानसारख्या शेकडो निष्पापांचं बलिदान सार्थकी लागेल.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.