www.24taas.com, लंडन
`आयर्न लेडी` म्हणून ओळखल्या इग्लंडच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचं हृदयविकाराने आज निधन झालं. त्या ८७ वर्षांच्या होत्या. मार्गारेट थॅचर या इंग्लंडच्या पहिल्या आणि आत्तापर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान होत्या. त्यांच्या धोरणांमुळे थॅचर १९७९, १९८३ आणि १९८७ असं तीनवेळा निवडणुकीत जिंकल्या होत्या.
मार्गारेट थॅचर यांचे प्रवक्ते लॉर्ड बेल यांनी मार्गारेट थॅचर यांच्या निधनाची घोषणा करताना म्हटलं, की अत्यंत दुःखाने सांगावं लागत आहे, की मार्क आणि कॅरोल थॅचर यांनी त्यांची आई बॅरोनेस थॅचर यांचं सकाळी निधन झाल्याचं सांगितलं आहे.
“लेडी थॅचर यांच्या निधनाची बातमी ऐकून मला अतिव दुःख झालं आहे. आपण एक महान नेतृत्व, महान पंतप्रधान आणि एक महान ब्रिटिश नागरिकाला मुकलो आहोत”- डेव्हिड कॅमेरॉन (इंग्लंडचे पंतप्रधान)
“बॅरोनेस थॅचर यांच्या निधनाचं वृत्त ऐकून राणीला दुःख झालं आहे. त्या व्यक्तिशः थॅचर यांच्या परिवाराला सांत्वनपर संदेश पाठवणार आहेत.” अशी प्रतिक्रिया बकिंगहॅम पॅलेसने दिली आहे.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही शोक व्यक्त करताना म्हटलं आहे, की थॅचर यांच्या काळात इंग्लंडने महत्वपूर्ण प्रगती केली. त्या एक बदल घडवणाऱ्या व्यक्ती होत्या. संपूर्ण देश माझ्यासह थॅचर परिवाराच्या, ब्रिटिश सरकारच्या आणि इंग्लंडमधील लोकांच्या दुःखात सहभागी होत आहे.
कार्य आणि निवृत्ती वेतन सचिव आयन डंकन स्मिथ यांनी मार्गारेट थॅचर यांच्या निधनावर शोक व्क्त करताना म्हटलं, की माझ्या राजकारणात येण्याचं कारण मार्गारेट थॅचर या होत. १९७९ साली त्यांनी ब्रिटनचा बदललेला चेहरा मोहरा पाहून मला राजकारणातील खरे नेतृत्व आणि राजकारणाचा खरा हेतू यांबद्दल विश्वास वाटला. त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असून माझ्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबासोबत आहे.
थॅचर यांच्या सोबत काम केलेले खासदार जॉन व्हाइटिंगडेल यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं, की बॅरोनेस थॅचर यांच्यासोबत काम करणाऱ्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाची वेगळी बाजू पाहिली आहे. त्यांच्यापाशी दया आणि अनुकंपा होती. त्यांनी निष्ठेला प्रोत्साहित केलं.
कम्युनिटी सेक्रेटरी एरिक पिकल्स यांनी ट्विट केलं आहे, की मार्गारेट थॅचर यांनी देशाला प्रखर आत्मविश्वास दिला. त्या महान पंतप्रधान आणि महान ब्रिटिश होत्या.