‘क्युरिओसिटी’चं काम अर्धवट राहणार?

नासानं मंगळावर धाडलेल्या क्युरिओसिटी रोव्हरमधलं एक सेन्सर निकामी झालंय. यामुळे नासातील शास्त्रज्ञांच्या चिंतेत भर पडलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 23, 2012, 01:53 PM IST

www.24taas.com, पासाडेना
नासानं मंगळावर धाडलेल्या क्युरिओसिटी रोव्हरमधलं एक सेन्सर निकामी झालंय. यामुळे नासातील शास्त्रज्ञांच्या चिंतेत भर पडलीय.
क्युरिओसिटी रोव्हरमधलं हवामानाचं अंदाज घेणारं रोबोट सेन्सर निकामी झालंय. ‘क्युरिऑसिटी रोव्हर’ मंगळावर उतरत असताना तिथं काही दगडही सापडले होते. त्यातीलच काही दगड उडून सेन्सर सर्किटवर आपटले असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केलाय. सेन्सर सर्किटच्या काही तारांचं नुकसान झाल्याचंही समजतंय. या तारा उघड्या पडल्या असून ही समस्या पृथ्वीवरून दूर करता येण्यासारखी नाही. या हवामान सेन्सरच्या साहाय्यानं हवा, पृष्ठभागाचे तापमान, हवेचा दाब, हवेतील आर्द्रता, वेग आणि दिशेबरोबरच पृष्ठभागावर येणाऱ्या नील किरणांच्या विकिरणांचे प्रमाण यांची आकडेवारी नासाला मिळते.
यामुळे काही काम थांबणार नसलं तरी, बऱ्याचशा बाबी नजरअंदाज कराव्या लागणार आहेत, त्यामुळे नासाचे शास्त्रज्ञांच्या आनंदावर विरजण पडलंय. पण, तरिही ‘समस्येवर लवकरच काही ना काही तोडगा काढण्यात येईल, अशी आशा मुख्य तपासणीस झेव्हीयर गोमेज अॅपल्वीरा यांनी व्यक्त केलीय. मात्र, या घटनेचा नासा शास्त्रज्ञांनी चांगलाच धसका घेतलाय. आता यापुढे तरी क्युरिओसिटीतील इतर सर्व उपकरणं योग्य रितीनं काम करतायत की नाही, याकडे हे सगळेच जण डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवणार आहेत.
दोन आठवड्यांपूर्वी नासाचं क्युरोओसिटी रोव्हर मंगळावर दाखल झालं होतं. या यानालाच ‘मार्स सायन्स लॅबरॉटरी’ म्हणजेच ‘एमएसएल’ असंही म्हटलं जातं. मंगळ ग्रहावरची इत्तंभूत माहिती मिळवण्यासाठी हा अतिशय महत्त्वकांक्षी प्रकल्प नासानं हाती घेतलाय.