www.24taas.com, इस्लामाबाद
२६/११च्या मुंबई हल्ल्याचा आरोपी आणि जमात-उद-दवाचा म्होरक्या हाफिझ मोहम्मद सईद याने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा ‘९/११च्या घटनेनंतर मुस्लिम म्हणून मला काय वाटतं?’ हा लेख वाचला आणि त्याला पाठिंबा देत पाकिस्तानात येण्याचं आमंत्रण दिलं आहे.
पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीशी बोलताना सईद हाफिझने शाहरुख खानला पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी सईद म्हणाला, भारतीय अभिनेता शाहरुख खानला माझा पाठिंबा आहे. जर त्याला भारतात असुरक्षित वाटत असेल, तर त्याने भारत सोडून पाकिस्तानात स्थायिक व्हावं. पाकिस्तानात त्याला आदर, प्रेम आणि बहूमान मिळेल.
एका आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात शाहरुखने लिहिले आहे, की कधी कधी मी राजकारण्यांच्या हातची अनोळखी वस्तू बनतो. काही राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी भारतीय मुस्लिमांच्या देशद्रोहाचं आणि चुकीचं असल्याचं प्रतीक म्हणून माझा वापर करतात.
“माझ्य़ा शेजारी राष्ट्राशी असलेल्या नात्यामुळे माझ्याच देशात माझ्या राष्ट्रनिष्ठेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केली जातात. मी भारतीय आहे. माझे वडील स्वातंत्र्यसेनानी होते आणि ते याच भारतासाठी ब्रिटिशांविरोधात लढले होते. मात्र तरीहीआज अनेक मोर्चे निघतात, ज्यात राजकीय नेते मला भारतातून हाकलवण्याचा प्रयत्न करतात. मी माझा देश सोडून त्यांच्या दृष्टीने जी माझी मातृभूमी आहे, त्या देशात मी निघून जावे असा आग्रह धरतात.” अशा शब्दांत शाहरुखने आपल्याला मिळणारी वागणूक व्यक्त केली होती.