नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंकेदरम्यान संपर्कासाठी आणि दळणवळणासाठी समुद्राखालून नवीन टनेल किंवा पूल बनवला जाण्याची शक्यता आहे. या प्रोजेक्टचं नाव असेल 'हनुमान सेतू'...
हा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी आशियाई विकास बँकेनं (एडीबी) 5.19 बिलियन डॉलर्सचा निधी उपलब्ध करून देण्याचीही तयारी दाखवली आहे.
परिवहन मंत्रालयाशी निगडीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात धनुषकोडीपासून श्रीलंकेच्या मलाईमन्नार भागापर्यंत जवळपास 22 किलोमीटरचं अंतर आहे. हे अंतर जोडायचं असेल तर रस्ता बनवला जाऊ शकतो.
या 22 किलोमीटर अंतरात केवळ अडीच किलोमीटरचा भाग असा आहे जिथं समुद्राची खोली खूप मोठी आहे. बाकीच्या भागात मात्र समुद्राची खोली फार मोठी नाही.
परिवहन मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यासंबंधी श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंगे यांच्याशीही याबाबतीत चर्चा झालीय आणि श्रीलंकेकडूनही प्रोजेक्टबाबतीत सकारात्मक प्रतिसाद मिळालाय.
जर हा प्रोजेक्ट यशस्वीपणे बनवण्यात आला तर यामुळे दक्षिण भारताच्या तमिळनाडूपासून श्रीलंकेला येणं-जाणं सोपं होईल. दळणवळणाचा सोपा मार्ग उपलब्ध झाल्यानं दोन्ही देशांतील व्यापारही वाढीस लागू शकेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.