जर्मनीत भारतीय विद्यार्थ्याची जीभ छाटली

इस्लाम धर्म स्वीकारत नाही म्हणून मुस्लिम कट्टरपंथीयांनी एका भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला करून त्याची जीभ छाटल्याची धक्कादायक घटना जर्मनीमध्ये बोनन येथे घडल्याचे जर्मन पोलिसांनी सांगितले.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 1, 2013, 08:18 PM IST

www.24taas.com, बर्लिन (पीटीआय)
इस्लाम धर्म स्वीकारत नाही म्हणून मुस्लिम कट्टरपंथीयांनी एका भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला करून त्याची जीभ छाटल्याची धक्कादायक घटना जर्मनीमध्ये बोनन येथे घडल्याचे जर्मन पोलिसांनी सांगितले.
ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली. भारतीय विद्यार्थी बोनन येथील आपल्या निवासस्थानी जात असताना हल्लेखोरांनी हल्ला करून हे कृत्य केले. हल्लेखोरांनी सुरूवातीला त्याचा धर्म विचारला आणि त्यानंतर त्याला इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितले. इस्लाम धर्म स्वीकारला नाही तर त्याची जीभ छाटण्यात येईल अशी धमकी या क्रूरकर्म्यांनी दिली. विद्यार्थ्याने त्यांचे म्हणणे ऐकले नाही, म्हणून हल्लेखोरांनी त्याला बेदम मारहाण केली आणि त्याची जीभ छाटून ते फरार झाले.
या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याची ओळख अद्याप पोलिसांनी सांगितली नाही. विद्यार्थ्याने या हल्लेखोरांच्या बडबडीकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ लागला त्यावेळी हल्लेखोरांनी मागून हल्ला केल्याचे विद्यार्थ्याने पोलिसांना सांगितले.
या संदर्भात पोलिसांनी जखमी विद्यार्थ्याला अजून कुठे जखम झाली या बद्दल सांगण्यास नकार दिला.
जखमी विद्यार्थ्याने दिलेली माहिती खरी असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी असलेल्या जमावाने अँब्युलन्सला फोन करून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. सध्या या विद्यार्थ्याला हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली आहे.