मानवतेचा अंत : 'सेक्स गुलाम' मुलींवर सर्वांदेखत सामूहिक बलात्कार

इराक आणि सीरियामध्ये दहशतवादाचं दुसरं नाव बनलेलं 'आयएसआयएस'चं आणखी एक घृणास्पद सत्य उघड झालंय. इराकच्या अल्पसंख्यांक यजीदी समुदायाच्या लोकांना इस्लामिक स्टेटच्या दशतवाद्यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात बंधक बनवलं होतं. यामध्ये अनेक महिला आणि मुलींचाही समावेश होता. 

Updated: Apr 16, 2015, 03:17 PM IST
मानवतेचा अंत : 'सेक्स गुलाम' मुलींवर सर्वांदेखत सामूहिक बलात्कार title=
इराकमधील परिस्थितीचं एक प्रातिनिधिक चित्र

नवी दिल्ली : इराक आणि सीरियामध्ये दहशतवादाचं दुसरं नाव बनलेलं 'आयएसआयएस'चं आणखी एक घृणास्पद सत्य उघड झालंय. इराकच्या अल्पसंख्यांक यजीदी समुदायाच्या लोकांना इस्लामिक स्टेटच्या दशतवाद्यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात बंधक बनवलं होतं. यामध्ये अनेक महिला आणि मुलींचाही समावेश होता. 

अनेक प्रयत्नांनंतर आयएसच्या दहशतवाद्यांनी यजीदी समुदायाच्या दोनशेच्यावर लोकांना आपल्या ताब्यातून मुक्त केलं पण, या लोकांवर ओढावलेला प्रसंग यामुळे समोर आलाय. आयएसच्या ताब्यात असताना त्यांची दयनिय अवस्था कशी होती हे ऐकताना अंगावर काटा उभा राहतोय. या दहशतवाद्यांनी मानवतेच्या सगळ्या सीमा ओलांडल्याचं त्यांचं कथन ऐकताना समोर येतंय. 

आयएसच्या ताब्यातून सुटलेल्या यजीदी समुदायाच्या ५५ मुलींनी गेल्या दहा महिन्यात जे पाहिलंय, जे भोगलंय ते एखाद्या नर्कापेक्षा कमी नाही. आपल्यावर अनेकदा सामूहिक बलात्कार झाल्याचं या मुलींनी म्हटलंय. हा बलात्कार त्यांच्यावर एखाद्या घरात किंवा बंद दरवाजामागे नाही... तर सार्वजनिक ठिकाणांवर त्यांच्यावर बलात्कार करण्यात आले. कधी दोघांनी तर कधी तीन-तीन दहशतवाद्यांनी त्यांच्यावर बलात्कार केले. यावेळी, त्यांचे नातेवाईकही असतं, इतर बंधकही असतं... आणि दहशतवादीही... आयएसच्या या दहशतवाद्यांनी यजीदी मुलींना सेक्स गुलाम बनवून ठेवलंय.


इराकमधील परिस्थितीचं एक प्रातिनिधिक चित्र

एका पीडित मुलीनं दिलेल्या माहितीनुसार, आयएसच्या ताब्यात असताना तिच्यावर दहाहून अधिक लोकांकडून बलात्कार झालाय. हे सगळेच जण मुख्य लढाखू आणि आत्मघाती हल्लेखोर होते.  
 
गेल्या जुलै महिन्यात सिंजर भागातून नागरिकांना आयएसच्या दहशतवाद्यांनी बंधक बनवलं होतं. यामध्ये वृद्ध आणि मुलांचाही समावेश होता. त्यांच्यासोबत केवळ मारहाण केली गेली पण, मुलींना मात्र नरकापेक्षा घृणास्पद परिस्थितीतून जावं लागलं. 
 
या बंधकांना सोडवण्यात एका एनजीओनं महत्त्वाची भूमिका निभावली. या संस्थेच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, बंधकांना सोडविण्यासाठी एक सौदा केला गेला. यानुसार, आयएसला मोठी रक्कम देण्यात आलीय. एनजीओनं दिलेल्या माहितीनुसार, अनेकदा बलात्कार आणि टॉर्चरच्या शिकार ठरलेल्या मुलींपैंकी अनेक जणींनी आपलं मानसिक संतूलन गमावलंय... जो दहशतवादी जास्त घृणास्पद काम करेल त्याला गिफ्ट म्हणून मुली दिल्या जात होत्या.

यापूर्वी आलेल्या एका रिपोर्टनुसार, उत्तर इराकमध्ये आयएसआयएस दहशतवाद्यांनी मानवतेच्या साऱ्या सीमा ओलांडत एका नऊ वर्षांच्या मुलीला आपलं गुलाम तर बनवलंच पण तिच्यावर अनेकदा बलात्कार करण्यात आले. या घटनेनंतर नऊ वर्षीय पीडित मुलगी गर्भवती झाल्याचंही सांगण्यात येतंय. जवळपास एक वर्ष ही मुलगी दहशतवाद्यांच्या तावडीत होती. यजीदी मुलींसोबतच इथं अनेक अल्पसंख्यांक महिला आणि मुलींना सेक्स गुलाम म्हणून ठेवण्यात आलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.