नौसैनिकांना धाडणार नाही; इटलीचं भारताला आव्हान

भारतात दोन मच्छिमारांच्या हत्येचा आरोप असलेल्या इटलीच्या दोन नौदल सैनिकांना परत भारतात धाडणार नाही, अशी भूमिकाच सोमवारी रात्री उशिरा भारतासमोर ठेऊन एकप्रकारे भारताच्या कायदाव्यवस्थेलाच आव्हान दिलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 12, 2013, 11:33 AM IST

www.24taas.com, रोम
भारतात दोन मच्छिमारांच्या हत्येचा आरोप असलेल्या इटलीच्या दोन नौदल सैनिकांना परत भारतात धाडणार नाही, अशी भूमिकाच सोमवारी रात्री उशिरा भारतासमोर ठेऊन एकप्रकारे भारताच्या कायदाव्यवस्थेलाच आव्हान दिलंय. संबंधित दोन इटली सैनिकांना उच्च न्यायालयानं निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी मायदेशी जाण्याची परवानगी दिली होती.
मास्सिमिलिआनो लाटोरे आणि सल्वातोरे गिरोने या दोघांवर केरळच्या समुद्र तटाजवळ दोन मच्छिमारांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. हे दोघे सैनिक मतदानासाठी मायदेशी परतले होते. मतदान केल्यानंतर त्यांनी पुन्हा भारतात परतण्याचे आदेश देण्यात आले होते पण इटलीच्या विदेश मंत्रालयानं मात्र भारताच्या उच्च न्यायालयाचा आदेश साफ धुडकावून लावलाय. उलट इटलीनं भारतीय अधिकाऱ्यांवरच आंतरराष्ट्रीय अधिकारांचं उल्लंघन केल्याचा आरोप लावलाय. बरोबरच, आंतरराष्ट्रीय मध्यस्थाच्या मदतीनं या प्रकरणाची चौकशी व्हावी, असा सल्लाही इटलीनं भारताला दिलाय. तसंच या दोन सैनिकांवर खटले चालवायचे असतील तर त्यांच्या देशातच चालवण्यात यावेत, असंही इटलीनं म्हटलंय.

२२ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयानं संबंधित इटलीच्या दोन सैनिकांना २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत मतदान करण्यासाठी जाण्याची परवानगी दिली होती. यावेळी न्यायालयानं या दोघांना केवळ इटलीमध्ये प्रवास करण्याची आणि राहण्याची परवानगी दिली होती. चार आठवड्यांनी ही मुदत संपणार होती. यापूर्वीही हे सैनिक ख्रिसमसची सुट्टी घालवण्यासाठी मायदेशी गेले होते आणि पुन्हा भारतात परतलेदेखील होते.