www.24taas.com, मॉस्को
मध्य रशियातील युराल पर्वतरांगामध्ये शुक्रवारी पहाटे जबरदस्त स्फोट होऊन उल्कापात झाला. आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. चेल्याबिन्स्क या कमी लोकसंख्या असलेल्या या भागात उल्कापात झाला त्यामुळे सुमारे ४०० लोक जखमी झाल्याचेही मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
उल्कापातामुळे घऱाच्या काचा फुटल्या आणि या काचांमुळे लोक जखमी झाल्याचे रशियाच्या गृहमंत्रालयाच्या प्रवक्याने सांगितले आहे. आकाशात एक चमकणारी वस्तू पृथ्वीवर पडल्याचे वृत्त होते. मात्र, हे विमान नसल्याचे नंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाने सांगितले आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार चेल्याबिन्सक आणि स्वेर्डलोव्सक या भागात आकाशातून चमकणाऱ्या आणि जळत्या वस्तू पडत होत्या.
चेल्याबिन्सक येथील प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार शुक्रवार पहाटे एक जोरदार स्फोटचा आवाज ऐकू आला. त्यानंतर टाऊन सेंटरच्या १९ मजली इमारतीत कंपन जाणवले. या भागात मोटारींच्या काचा फुटल्याचे आवाजही ऐकू आले. तसेच या भागातील मोबाईल यंत्रणाही विस्कळीत झाली होती.