लाहोर : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. शरीफ यांच्या पनामा पेपर्स घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेत.
न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली चौकशी आयोग नियुक्त करुन ही चौकशी करण्यात यावी असे निर्देश न्यायालयाने दिलेत. या न्यायालयीन आयोगाची कार्यकक्षा ठरवण्यासाठी पाकिस्तान सरकार आणि याचिकाकर्त्यांनी सूचना सादर कराव्यात, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
तसेच याबाबत एकमत झाले नाही तर आम्हीच ती निश्चित करु, असेही न्यायालयाने म्हटले आहे. नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाचा पनामा पेपर्समध्ये उल्लेख आल्यानंतर इम्रान खान आणि इतर अनेकांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी याचिका न्यायालयात केली आहे.