काठमांडू : निसर्गापुढे सर्वांनीच हात जोडले असून नेपाळचे राष्ट्रपती रामबरन यादव यांनी मोकळ्या पटांगणात पूर्ण रात्र जागून काढली आहे.
भूकंपाननंतर नेपाळमध्ये झालेल्या मोठ्या नुकसानीत अध्यक्ष राम बरन यादव यांच्या कार्यालय वजा निवासालाही धक्का पोचला आहे. त्यामुळे अध्यक्षांनी शनिवारची रात्र तंबूत काढली.
भूकंपामुळे शतकापूर्वीची अध्यक्षांच्या कार्यालय वजा निवासाची इमारत कोसळण्याच्या भीतीने यादव आणि त्यांच्या सुरक्षारक्षकांनी शनिवारची संपूर्ण रात्र तंबूत काढली.
ब्रिटिशांच्या स्थापत्यशास्त्रानुसार उभारण्यात आलेली अध्यक्षांच्या कार्यालयाची इमारत दीडशे वर्षे जुनी आहे. "शितल निवास‘ नावाची ही इमारत अलिकडेच नेपाळचे विदेश मंत्रालय वापरत होते.
इमारतीच्या स्वयंपाकघरासह अन्य काही भागाला भूकंपामुळे तडे गेले आहेत. "अध्यक्ष यादव अजूनही तंबूतच आहेत‘ अशी माहिती माध्यमांशी बोलण्याचा अधिकार नसलेल्या अधिकाऱ्याने दिली आहे.
शनिवारी झालेल्या भूकंपामध्ये 2200 पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले असून मोठ्या प्रमाणावर नुकसानही झाले आहे.
अध्यक्षांप्रमाणेच नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांच्याही निवासाला मोठ्या प्रमाणात धक्का पोचला आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वाराची पडझड झाली आहे. भूकंपाच्या वेळी कोईराला इंडोनेशियामध्ये होते. याशिवाय अन्य काही शासकीय कार्यालयांनाही भूकंपामुळे बाधा पोचली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.