www.24taas.com, वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी इराक प्रश्नी मौन सोडलंय. परिस्थितीचा आढावा घेऊन गरजेनुसार कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलंय. गरज पडली तरच इराकमध्ये सैन्य पाठवलं जाईल मात्र पुन्हा युद्ध व्हावं अशी आमची इच्छा नाही, असंही ते म्हणालेत.
इराकमध्ये कुणाचं सरकार असावं, हे ठरवणं आमचं काम नाही, अशा शब्दांत त्यांनी इराकमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षावर भाष्य केलंय. इराकमध्ये दहशतवादी गटाने काही शहरांवर कब्जा केला. तर तेलसाठे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे इराकमध्ये यादवीची परिस्थिती निर्माण झालेय. अनेक लोकांना बंधक करण्यात आले आहे. हा प्रश्न निकाली लागण्यासाठी इराकने अमेरिकेची मदत मागितली. त्यावर अमेरिकेने उत्तर दिले नव्हते.
दरम्यान, इराकमध्ये अपहरण झालेल्या ४० भारतीयांचं ठिकाण समजल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलंय. मात्र अद्याप त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नसल्याचं मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितलंय. मंत्रालय सातत्यानं इराक सरकारच्या संपर्कात आहे. भारतीयांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असंही त्यांनी म्हटलंय.
अपहृत नागरिकांच्या नातलगांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. इराकमध्ये अडकलेल्यांच्या सुटकेसाठी सरकारनं युद्धपातळीवर प्रयत्न करावेत आणि त्यांना सुखरूप मायदेशी घेऊन यावं अशी मागणी या नातलगांनी स्वराज यांच्याकडे केलीये. परराष्ट्र मंत्र्यांनी याबाबत सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.