www.24taas.com , झी मीडिया, वॉशिंग्टन
अमेरिकेनं अखेर सीरियावर हल्ला करण्याचा निर्णय घेतलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. सीरियावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला असून या हल्ल्याबाबत अमेरिकेतल्या संसदेचीही मंजूरी मिळाली असल्याचं ओबामांनी स्पष्ट केलं.
सीरियामध्ये जे काही होतंय त्याकडे अमेरिका दुर्लक्ष करू शकत नाही. सीरियावर सैनिकी कारवाई होणं गरजेचं आहे. ओबामांच्या या वक्तव्यानंतर अमेरिका सीरियावर हल्ला करेल हे नक्की मानलं जातंय. कमी वेळात,ठराविक हल्ले करण्याची योजना आखली जात असून सैन्य सीरियाच्या जमिनीवर उतरणार नाही, असंही ओबामांनी स्पष्ट केलं.
दुसरीकडे रासायनिक शस्त्रांच्या वापराबाबत तपास करत असलेले यूएनचे तज्ज्ञ सीरियातून परतले आहेत.त्यापूर्वीकुठल्याही परिस्थितीत रासायनिक शस्त्रांचा वापर आंतरराष्ट्रीय समुदाय खपवून घेणार नाही, असं ओबामांनी स्पष्ट केलं होतं.
ओबामा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सिच्युएशन रूम बैठकीतून बाहेर निघाल्यानंतर परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी माहिती दिली की, सैन्य हस्तक्षेपाबाबत रशियाचा विरोध बघता अमेरिका सीरियावरील हल्ल्याबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून परवानगी घेणार नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.