स्वीस बँकांच्या खातेदारांची माहिती होणार उघड!

काळा पैसा दडवून ठेवण्यासाठी स्वीस बँकांचा वापर होतो हे तर सगळ्यांनाच माहित झालंय. परंतु, आता स्वीस सरकारनं या बँकांमधील खातेदारांची माहिती आणि इतर तपशील भारतासह इतर देशांना देण्यासाठी तयारी दर्शविली आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 16, 2013, 08:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काळा पैसा दडवून ठेवण्यासाठी स्वीस बँकांचा वापर होतो हे तर सगळ्यांनाच माहित झालंय. परंतु, आता स्वीस सरकारनं या बँकांमधील खातेदारांची माहिती आणि इतर तपशील भारतासह इतर देशांना देण्यासाठी तयारी दर्शविली आहे. यामुळे या बँकांच्या खात्यात काळा पैसा दडवून ठेवणाऱ्यांचे धाबे दणाणलेत.
काळ्या पैशाच्या गुंतवणूकदारांची माहिती स्वीस बँकांकडून मिळवून त्यांच्यावर खटला चालविणं यामुळे शक्य होणार आहे. या बँकांच्या खातेदारांचे तपशीलही उपलब्ध होऊ शकतील. गेल्या अनेक वर्षांपासून भारतासह जगभरातील अन्य काही देशांनी स्विस बँकांमधील खात्यांचा तपशील देण्याची मागणी लावून धरली होती. स्वित्झर्लंडमध्ये अर्थविषयक, तसेच बँक खात्यांतील माहिती गुप्त ठेवली जाते. मात्र, आता ही माहिती देण्यास सरकारनं तयारी दर्शवलीय.

यासाठी स्वीस सरकारनं भारतासह जगभरातील ५८ देशांसबत ‘ओईसीडी करार’ केलाय. या करारांतर्गत स्वीस बँकांमधील खातेदारांची तसंच त्यांनी केलेल्या देवाण-घेवाणीची माहिती भारत सरकारला उपलब्ध होऊ शकेल. करारबद्ध देशांना स्वीस बँकांमधील माहिती देणार असल्याचे ‘स्वीस फेडरल काऊन्सिल’ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.