चामडी विकून पाक अतिरेक्यांनी कमविले ८० कोटी

पाकिस्तानात प्रतिबंधित दहशतवादी संघटनांनी जनावरांचे कातडे विकू नये, असे निर्बंध झरदारी प्रशासनाने लादलेले असतानाही इद-उल-झुहाचे (बकरी ईद) निमित्त साधून पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जनावरांचे चामडे विकून सुमारे ८० कोटी रुपयांची माया जमवली आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 11, 2012, 03:51 PM IST

बकरी ईदचा घेतला फायदा
www.24taas.com, इस्लामाबाद
पाकिस्तानात प्रतिबंधित दहशतवादी संघटनांनी जनावरांचे कातडे विकू नये, असे निर्बंध झरदारी प्रशासनाने लादलेले असतानाही इद-उल-झुहाचे (बकरी ईद) निमित्त साधून पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जनावरांचे चामडे विकून सुमारे ८० कोटी रुपयांची माया जमवली आहे. पाकिस्तानच्या ‘डॉन’ या प्रमुख दैनिकानेच गुप्तचर संघटनांच्या हवाल्याने ही माहिती प्रसिद्ध केली आहे.
‘बकरी ईद’च्या दिवशी पाकिस्तानात लाखो छोट्या-मोठ्या जनावरांची ‘कुर्बानी’ देण्यात आली. या धार्मिक उत्सवाचे निमित्त साधून मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीझ सईदच्या जमात-उद-दावा आणि त्यांच्याशी संबंधित फलाह-इ-इन्सानियत संघटनेने एकूण ९२,८०० कातडी गोळा करून ती विकली.
जैश-ए-मोहम्मद व अल-रेहमत ट्रस्ट या इस्लामी दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविणार्याी संघटनेनेही अशीच हजारो कातडी जमवून ती लाखो रुपयांना विकली. ‘कातड्या’चा असा गोरखधंदा करणार्याड अतिरेकी संघटनांत सिपाह-ए-साहबा पाकिस्तान, तहारिक-ए-जाफरिया पाकिस्तान, शिया उलेमा कौन्सिल, सुन्नी तहरिक, हरकत-उल-मुजाहिदीन आणि अल-वदर-मुजाहिदीन यांचाही समावेश होता.

पोलिसही दहशतवाद्यांपुढे हतबल
पाकिस्तानी गृहमंत्रालयाने प्रतिबंधित अतिरेकी संघटनांच्या कातडी ‘खरेदी-विक्री’ शिबिरांवर कडक प्रतिबंध लादले होते. तशा सूचनाही सर्व प्रांतांच्या पोलिसांना दिल्या होत्या. पण पोलिसांच्या विरोधाला न जुमानता दहशतवादी गटांनी ‘बकरी ईद’ला लाखो कातडी गोळा करून ती विकली आणि ८० कोटी रुपयांची कमाई केली, अशी माहिती पाकिस्तानातील पंजाब पोलीस गुप्तचर विभागाने दिली.