www.24taas.com, इस्लामाबाद
मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणी चौकशी करण्यासाठी पाकिस्तानचं एक आयोग लवकरच भारतात दाखल होणार आहे. २६/११ प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यासाठी येणाऱ्या या आयोगाच्या भारत दौऱ्याला भारताकडून हिरवा कंदील मिळालाय.
भारतानं पाकच्या न्यायिक आयोगाला संमती दिल्यानं फेब्रुवारी महिन्यात हा आयोग मुंबईत दाखल होईल. पाकचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी ही माहिती दिलीय. हा या आयोगाचा दुसरा दौरा असेल. मागच्या वर्षी मार्च महिन्यात या आयोगानं भारताचा दौरा केला होता. पण, आयोगाच्या निष्कर्षांना पाकच्या एका दहशतवाद विरोधी न्यायालयानं केराची टोपली दाखवलीय. लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी रेहमान लखवी याच्यासोबतच आणखी सात संशयितांशी संबंधित खटल्याची सुनावणी या कोर्टात सुरू आहे.
डिसेंबरमध्ये दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर भारतानं पाकिस्तानच्या आयोगाला चौकशीची परवानगी दिली होती.