www.24taas.com, इस्लामाबाद
अमेरिकेतल्या इस्त्रायली ज्यू निर्मात्यानं बनवलेल्या `इनोसन्स ऑफ मुस्लिम` या वादग्रस्त चित्रपटाविरोधातील निदर्शनांचं लोण लिबिया, इजिप्त, येमेननंतर आता पाकिस्तानात पोहचलंय.
अमेरिकेविरोधात निदर्शनं करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं पाकिस्तानी नागरिक इस्लामाबादच्या रस्त्यांवर उतरले होते. डिप्लोमॅटिक एरियामध्ये सुरु असलेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागल्यानं परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लष्कराला पाचारण करावं लागलं. हिंसक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी यावेळी लष्कराकडून हवेत गोळीबार करण्यात आला. यावेळी निदर्शकांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि दगडफेक केली.
दरम्यान, इस्लामचा अपमान करणारी कोणतीही कृती भाषणस्वातंत्र्याच्या नावाखाली खपवून घेतली जाणार नाही, असं पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रांना कळवलंय. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान-की-मून यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना पाकिस्तानचे यूएन राजदूत अब्दुल्ला हुसेन हरून यांनी पत्र पाठवलंय. ‘इनोसन्स ऑफ मुस्लिम्स’ या माहितीपटाचं ट्रेलर यू-ट्यूबवर प्रसारित झाल्यानंतर अनेक मुस्लिम राष्ट्रांत हिंसक निदर्शनं सुरू आहेत. मून यांनी या हिंसाचाराचा निषेध केला होता. या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रांना हे पत्र लिहिलंय. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मात्र हा चित्रपट हे हिंसाचारासाठी शोधलेलं निमित्त आहे, असं म्हटलंय.