www.24taas.com, न्यूयॉर्क
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांची नुकतीच भेट घेतलीय. उभयतांमध्ये झालेल्या चर्चेत अमेरिकेच्या व्हिसा शुल्कात झालेली वाढ, पाकिस्तानबरोबरचे संबंध सुधारणेसाठी घेतले गेलेले निर्णय आणि विस्कोन्सिनच्या गुरद्वारात झालेला गोळीबार अशा काही विषयांवर चर्चा झाल्याचं समजतंय.
जवळजवळ पाऊण तास झालेली ही चर्चा सकारात्मक असल्याचं एस. एम. कृष्णा यांनी म्हटलंय. अमेरिकेनं व्हिसा शुल्कात केलेल्या वाढीमुळे भारतीय विद्यार्थ्याच्या चिंतेत भरच पडलीय. ही गोष्ट कृष्णा यांनी हिलरी क्लिंटन यांच्या निदर्शनास आणून दिलीय. पण, सध्या अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणुकीची धूम सुरू आहे त्यामुळे यावर ताबडतोब काही मार्ग निघणं सध्या तरी कठिण दिसतंय, असं एस. एम. कृष्णा यांनी म्हटलंय. अमेरिकेनं व्हिसा शुल्कात वाढ केल्यानं भारतातल्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रो आणि महिंद्रा, सत्यम यांसारख्या कंपन्यांवर त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो.
क्लिंटन आणि कृष्णा यांची या वर्षातली ही तिसरी भेट ठरलीय. भारत आणि पाकिस्तानमधले संबंध सुधारणेच्या प्रयत्नांचं क्लिंटन यांनी स्वागत केलंय.