इस्तंबूल : तुर्कस्तानमध्ये लष्कराने उठाव केला असून सर्वत्र ताबा मिळवल्याचा दावा लष्करानं केलाय. मात्र सैन्याकडून होत असलेला सत्तापालट पोलिसांनी उधळून लावलाय.
हेलिकॉप्टरमधून झालेल्या बॉम्ब हल्ल्यात १७ पोलीस अधिकाऱ्यांसह दोन नागरिक ठार झालेत. सरकारविरोधात लष्कराने रणगाडे रस्त्यावर उतरवले असून इस्तंबूल आणि राजधानी अंकारा शहारात येणारे रस्ते बंद करण्यात आलेत.
दरम्यान, सध्या देशातील स्थिती नियंत्रणात असल्याचं तुर्कस्तानच्या पंतप्रधानांनी म्हटलं. 'लष्कराची ही चाल यशस्वी होऊ देणार नाही. देशातील सत्तापालट करण्यामागे असलेल्या सक्तीला मोठी किंमत मोजावी लागेल' असं पंतप्रधान येल्डरिन यांनी म्हटलंय. इथं सोशल मीडिया पूर्णपणे बंद करण्यात आलाय.
दरम्यान सध्या संपूर्ण देशात जमावबंदी लागू करण्यात आली असून तुर्कस्थान 'नो फ्लाईंग झोन' घोषीत करण्यात आलाय. तुर्कस्तानच्या संसद भवनावर बॉम्बटाकल्याचं वृत्त समोर येतंय. मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा तुर्कस्तानच्या पंतप्रधानांनी केलाय.
तुर्कस्थानमध्ये ही परिस्थिती लगेचच निर्माण झालेली नाही. गेल्या ३-४ वर्षांपासून ही परिस्थिती तयार होत होती. सैन्यातील एका वर्गात असंतोष खदखदत होता. हा उठावही अशा वेळी करण्यात आला जेव्हा टर्कीचे पंतप्रधान सुट्टीवर गेले होते.
यात बॉम्बहल्लाही करण्यात आला. हेलिकॉप्टरमधून बॉम्ब टाकला गेला. त्यांना शस्त्रपुरवठा करणारे कोण? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
पाकिस्तानमध्येही अनेकदा हे घडलंय. अनेकदा सत्तापरिवर्तन तिथं घडून आलंय. जेव्हा, राजनैतिक सत्ता असक्षम, अकुशल ठरते, तेव्हा ही परिस्थिती निर्माण होते. सत्तापरिवर्तनासाठी आसुललेल्या इतर राजनैतिक शक्तींचा या उठावाला अप्रत्यक्षरित्या पाठिंबा असू शकतो, असं निवृत्त लष्कारी अधिकारी दत्तात्रय शेकटकर यांनी म्हटलंय.