www.2taas.com, रोम
भारतीय मच्छिमारांच्या हत्येत आरोपी असलेले इटलीचे दोन्हीही नौसैनिक आज भारतात परतणार आहेत. भारत आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यानं भारताची कूटनीती यशस्वी ठरलीय.
इटलीनं दोन नौसैनिकांना भारताच्या हवाली करण्याचा निर्णय घेतलाय. इटलीचा हा निर्णय त्यांच्या विदेश मंत्रालयाच्या अगदी विरुद्ध आहे. याआधी इटली विदेश मंत्रालयानं या दोन नौसैनिकांना भारतात परत धाडणार नाही अशी घोषणा केली होती. इटलीचे नौसैनिक मेसिमिलिएनो लॅटोर आणि सैल्वाटोर जाइरोन या दोन नौसैनिकांवर दोन भारतीय मच्छिमारांच्या हत्येचा आरोप आहे. देशातील मतदान प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी भारतानं या दोघांना मायदेशी जाऊन परत येण्याचे आदेश दिले होते. २२ मार्चपर्यंत त्यांनी पुन्हा स्वत: भारतात उपस्थित व्हावं, या अटीवर त्यांना ही परवानगी मिळाली होती.
भारत आणि इटलीच्या या विरुद्ध भूमिकांमुळे काही काळ दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला होता. याच दरम्यान, भारताच्या सुप्रीम कोर्टानं इटलीच्या राजदूतांना भारताबाहेर जाण्यास मज्जाव केला. त्यानंतर इटलीला आपला निर्णय बदलणं भाग पडलंय. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात इटलीच्या या दोन नौसैनिकांनी समुद्र तटाच्याजवळ दोन भारतीय मच्छिमारांची गोळी मारून हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.