पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा; `युनो`चा अमेरिकेला दणका

अमेरिका आणि इस्त्रायलचा कडाडून विरोध असतानाही संयुक्त राष्ट्रसंघ (युनो)ने आज पॅलेस्टाईन या देशाला स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्राचा दर्जा दिला. युनोमध्ये सदस्य असलेल्या १९३ देशांपैकी १३८ देशांनी पॅलेस्टाईन स्वतंत्र राष्ट्र असावे, या बाजूने मतदान केले. तर, अमेरिका व इस्त्रायलसह ९ देशांनी पॅलेस्टाईन राष्ट्र होण्याला विरोध केला.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 30, 2012, 06:05 PM IST

www.24taas.com, जीनिव्हा
अमेरिका आणि इस्त्रायलचा कडाडून विरोध असतानाही संयुक्त राष्ट्रसंघ (युनो)ने आज पॅलेस्टाईन या देशाला स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्राचा दर्जा दिला. युनोमध्ये सदस्य असलेल्या १९३ देशांपैकी १३८ देशांनी पॅलेस्टाईन स्वतंत्र राष्ट्र असावे, या बाजूने मतदान केले. तर, अमेरिका व इस्त्रायलसह ९ देशांनी पॅलेस्टाईन राष्ट्र होण्याला विरोध केला.
दरम्यान, भारताने आपले मत पॅलेस्टाईनच्या पारड्यात टाकले आहे. अमेरिकेचा कडवा विरोध पाहता ४१ देशांनी या प्रस्तावावर मतदानच केले नाही. यापूर्वी इस्त्रायलला `स्वतंत्र प्रदेश` असा दर्जा होता.
इस्त्रायलसह अमेरिका, कॅनडा, झेक रिपब्लिक, पलाऊ, मायक्रोनिशा, नावरु, पनामा आणि मार्शाल बेटे या देशांनी पॅलेस्टाईनच्या विरोधात मतदान केले आहे. यात अमेरिका, कॅनडा वगळता इतर देशांची नावे ऐकली नसतील, अशी स्थिती आहे.

पॅलेस्टाईन आता स्वतंत्र राष्ट्र झाल्याने आंतरराष्ट्रीय क्षीतिजावर आणखी एका वादग्रस्त देश उदयास आला आहे. पॅलेस्टाईन आणि इस्त्रायल यांच्यात उघड सुरु असलेला संघर्ष हा सध्या जगभरातील सर्वांधिक मोठा वाद ठरत आहे. दरम्यान, पॅलेस्टाईनला आता आंतरराष्ट्रीय दारे उघडी झाली, असून त्यांना आफ्रिका व आशिया खंडातील देशांचे मोठे पाठबळ मिळण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचा इस्त्रायला पाठिंबा असून, पॅलेस्टाईनची कोंडी करण्यासाठी आर्थिक पातळीवरही प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना फारसे यश मिळाले नाही. तोच मुद्दा घेऊन पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी स्वतंत्र राष्ट्राच्या ठरावाला पाठिंबा मिळविण्यासाठी मोठा प्रचार केला होता. त्यामुळे युरोपीय राष्ट्रांनीही पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला होता. एकूनच पॅलेस्टाईनचे पारडे जड होत चालले असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत. शिवाय, सार्वभौम राष्ट्राचा दर्जा मिळाल्याने हेगमधील आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात धाव घेणे पॅलेस्टाईनला सोपे होणार आहे. असे असले तरी पॅलेस्टाईन अजूनही युनोमध्ये `असदस्यीय राष्ट्र` असणार आहे.