वॉशिंग्टन : दहशतवाद हा सर्वात मोठा धोका आहे. दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलण्याची गरज आहे. दहशतवादाचा किल्ला भारताच्या शेजारीच आहे, असे म्हणत पाकिस्तानचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकवर निशाणा साधला.
तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅपिटल हिलमध्ये दाखल झालेत. ते अमेरिकन काँग्रेसला संबोधित करताना बोलत होते. मोदी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना भेटून व्दिपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. तसेच अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनामध्ये भाषण केले.
दरम्यान, अफगाणिस्तानाबाबत अमेरिकेने घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे, असे मोदी म्हणालेत. एका लोकशाहीकडून दुसरी लोकशाही सशक्त होत आहे. कॅपिटल हिल्स लोकतंत्रचे मंदिर आहे. अमेरिकेने १२५ कोटी भारतीयांचा सन्मान केलाय, असे प्रतिपादन मोदी यांनी केले.
सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला, तेव्हा अमेरिकेने दिलेला पाठिंबा भारत कधीही विसरणार नाही. २०२२ या वर्षापर्यंत भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम देश असेल. २०२२ पर्यंत भारतातील प्रत्येक गावात इंटरनेट पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. सामाजिक आणि आर्थिक बदलाच्या माध्यमातून करो़डो नागरिकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे हे माझे स्वप्न आहे, असे मोदी म्हणालेत.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करताना सांगितले, अमेरिकन संविधानाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रभाव होता. भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक मित्र असल्याचं माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पूर्वीच सांगितले आहे. आमचं संविधान भेदभाव न राखता सर्वांना समान अधिकार देते असे सांगत मोदींनी अमेरीकेतील काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनामधील भाषणात महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, मार्टिन लूथर यांच्या कामगिरीचा उच्चार केला.
मोदी यांचा अमेरिका दौरा भरगच्च कार्यक्रमांनी आखला गेलाय. आहे. अमेरिकन काँग्रेसमध्य भाषण करणारे ते भारताचे पाचवे पंतप्रधान आहेत. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या निमंत्रणावरुन मोदी अमेरिका दौऱ्यावर आहेत. दरम्यान, काल स्वित्झर्लंड दौऱ्यावरुन मोदी अमेरिकन प्रमाणवेळेनुसार दुपारी वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले. स्वित्झर्लंड दौऱ्यात मोदींनी न्यूक्लियर सप्लायर ग्रुपमध्ये (एनएसजी) भारताच्या समावेशासाठी महत्वपूर्ण असलेला स्वित्झर्लंडचा पाठिंबा मिळवला. स्वित्झर्लंड एनएसजीचा सदस्य आहे.