www.24taas.com, वॉशिंग्टन
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत आता चांगलेच रंग भरू लागले आहेत. मिट रॉम्नींसोबत बराक ओबामांची कितीही अटीतटीची लढाई असली तरी ओबामा हेच बाजी मारतील, अशी चिन्हे आहेत. पहिल्या जाहीर मुलाखतीत मिट यांनी बाजी मारली तरी दुसऱ्या लढाई ओबामा जिंकले. तर ताज्या फेरीत ओबामा यांनी मिट रॉम्नी यांच्यावर निसटती आघाडी घेतली तरी भारतासह जगातील अन्य देश ओबामांसोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अमेरिका अध्यक्षीय निवडणुकीत राजकीय वातावरण तापू लागले आहे. चर्चेच्या ताज्या फेरीत रिपब्लिकन उमेदवार मिट रॉम्नी यांच्यापेक्षा अध्यक्ष बराक ओबामा यांनी निसटती आघाडी घेतली आहे. चर्चेच्या गेल्या दोन फेऱ्यांमध्ये चांगली कामगिरी करून सरासरी २ . १ गुणांची आघाडी मिळवत ओबामांनी आपली बाजू मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. नुकत्याच झालेल्या चर्चेच्या फेरीत ओबामांना रॉम्नींपेक्षा पाच गुणांची आघाडी मिळाल्याचे टाइम मासिकाने म्हटले आहे.
बराक ओबामा यांना जगभरातून पाठिंबा मिळत आहे. मात्र, पाकिस्तानातून तीव्र विरोध झाला आहे. तर गॅलप पोलमध्येही निवडणुकीत कळीची भूमिका बजावणाऱ्या ओहिओ प्रांतात ओबामा रॉम्नींपेक्षा पाच गुणांनी आघाडीवर आहेत. भारतासह जगातील इतर देशांमधील लोकांना मात्र ओबामांचीच अध्यक्षपदी फेरनिवड व्हावी असे वाटते. बीबीसी वर्ल्ड सर्विसने घेतलेल्या सर्वेक्षणात ही बाब उघड झाली आहे. या पाहणीत २१ पैकी २० देशांत ओबामांच्या नावाला पसंती देण्यात दिली आहे.
गेल्या १४ ऑक्टोबरपासून रॉम्नी गॅलप पोलमध्ये ओबामांपेक्षा पाच ते सात गुणांनी पुढे होते. यावेळी पहिल्यांदाच ओबामांनी बाजी मारली आहे. राष्ट्रीय आणि विभागीय पातळीवरील पोलमध्ये ओबामा आणि रॉम्नी अगदी अटीतटीच्या स्पर्धेत असल्याचे दिसते. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार ओबामांनी बाजी मारलेली दिसत असली तरी संभ्रमनात असलेल्या मतदारांना आपल्याकडे वळवण्यात रॉम्नी यांनी बाजी मारल्याचे दिसत आहे.